Saturday, 21 December 2013

विठ्ठल
रूप तुझे लेकुरवाळे
भक्तांमध्ये दुडूदुडू खेळे
देवादिंचा देव तू पांडूरंग
बाळ गोपाळांमध्ये होई दंग

Thursday, 19 December 2013

जोडीदार


तुमचा जोडीदार तुमच्या 
कोणत्या गुणांवर भाळतो 
या पेक्षा कोणत्या अवगुणांना 
कंटाळतो यावर लक्ष द्या 
.
.
भविष्यात त्या अवगुणांना टाळून 
नात्यातील मतभेद दूर करता येतील

दुर्गवीर चा धिरु 
माझे अंतरंग 

Wednesday, 18 December 2013

हळवा थेंबत्या चिंब पावसाचा
मी हळवा थेंब जणू
कधी हसवे…… कधी रडवे….…
या पावसास काय म्हणू…
दुर्गवीर चा धीरु
http://dhiruloke.blogspot.in/

Saturday, 14 December 2013

Smile Please


लोक सांगतात जर
मनापासून डोळे बंद केले तर 
तुमच ज्याच्यावर प्रेम आहे 
त्याचा चेहरा दिसतो…… 
म्हणून मी पण काल ट्राय केल………… 
थेट सकाळीच उठलो ना राव…… 

दुर्गवीर चा धिरु 
माझे अंतरंग 

Wednesday, 4 December 2013

मराठी ग्राफीटीआपल्याला होणा-या त्रासापेक्षा 
आपल्या माणसांना होणारा त्रास 
हा जास्त त्रासदायक असतो

Monday, 2 December 2013

विश्वास


एखाद्याला मदत करताना 

एक विचार कायम मनात ठेवा
कि "तो आपल्याला फसवू शकतो" 
कारण 
जर त्याने फसविले तर 
"कमी होते" ते त्यापासून होणारे "दु:ख 
जर नाही फसविले तर 
"वाढतो" तो "विश्वास"
 
माझे अंतरंग 
दुर्गवीर चा धिरु 

Wednesday, 27 November 2013

मदत
गरजवंताच्या असहाय्यतेचा फायदा उठविणे 
म्हणजे 
मदत नव्हे… 

दुर्गवीर चा धिरु  

Saturday, 23 November 2013

खरा मित्र

यश तुमच्याकडे पाठ फिरवून असताना,
जो तुमच्या पाठीशी असतो…. 
तो "खरा मित्र" 

दुर्गवीर चा धिरु

Tuesday, 19 November 2013

ऐक माझी आर्त हाक….ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! 
झाकलेले डोळे अन मिटलेले ओठ,  
पहावत नाहीयत मला,
तुझ्या या चेह-यावरचे निर्जीव भाव 
सोसवत नाहीयत मला… 

ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! 
तुझ भांडण हि मान्य, 
तुझ रागावण हि मान्य, 
पण तुझ हे निपचीत पडणं,
पहावत नाहीय मला

ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना ! 
ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !!  

दुर्गवीर चा धिरु 
माझे अंतरंग 
http://dhiruloke.blogspot.in/

Monday, 18 November 2013

भगवा....
डोईवर भगवा फेटा
अन कपाळी केशरी कोर 
पाईक मी या भगव्याचा 
ना होई कधी कमजोर

दुर्गवीर चा धिरु 
माझे अंतरंग 

माझी माणुसकी....दुनियादारी

माझी माणुसकी जर 
दुनियादारी असेल तर …
तर हो मी करतो दुनियादारी
आणि 
आयुष्यभर करत राहणार…………. 
दुर्गवीर चा धिरु 
माझे अंतरंग 
http://dhiruloke.blogspot.in/

Saturday, 16 November 2013

तो………….


तो…………. 
तो फक्त उभा राहिला कि सगळे कागदी शेर कानाकोप-यात पळावे…… 
त्याने Bat उचलावी ती शतक झळकविण्यासाठी अशी भाबडी आशा प्रत्येकाने बाळगावी  …. 
त्याने टायमिंग आणि कलाई च्या सहाय्याने असे फटके मारावेत कि गोलंदाजानेहि दाद द्यावी…. 
विकेट मिळत नाही म्हणून त्याला डिचवायच्या नादात गोलंदाजाने स्वताच हसं करून घ्यावं…. 
तो नव्वदीत बाद झाला म्हणून लहान थोरांनीही आकांत-तांडव कराव……
तो मैदनात येताना आणि मैदानातून जाताना एकच आवाज यावा…  
सचिन……… सचिन ………… सचिन ………. 
पण यापुढे कधीच नाही…………………… 

Wednesday, 6 November 2013

मोहीम तोरणा ते राजगड भाग - १


मोहीम तोरणा ते राजगड भाग - १ 
माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त दिवस चालेलेली दुर्गदर्शन मोहीम दि. 2 नोव्हेंबर 2013 ते 4 नोव्हेंबर 2013 
ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी रात्री आम्ही एस टी महामंडळ ने निघणार होतो. कोणी म्हणायचं १००० ची गाडी आहे कोणी म्हणायचं १०:३० ची गाडी पण होती ११:१५ ची ते चालायचं. मी नितीन, प्रशांत, योगेश, राज,  सुरज, प्रीतेश आम्ही "नेहमीप्रमाणे" वेळेपूर्वीच परेल डेपोत हजर झालो. गडावर मशाल पेटवायची त्यासाठी लागणार ऑईल कुणीच आणल नव्हत त्यामुळे डेपोत कुणी ऑईल देत का त्याची विचारपूस मी व प्रशांत बंधुनि सुरु केली. आपला निभाव काही लागत नाही आणि आपल्याला ऑईल काही मिळत नाही अस वाटल्यावर आम्ही परतत होतो तेवढ्यात एका एस टी महामंडळ च्या कर्मचा-याने आम्हाला हाक मारून बोलावले आणि ऑईल सुपूर्द केले नेहमीप्रमाणे आम्हाला या शिवकार्यात आमच्या अडचणीला कोणी न कोणी उभा राहतो याचा पुन्हा प्रत्यय आला.  ऑईल मिळाल्याच्या आनंदात आम्ही आम्ही बाकी दुर्गवीरांच्या सोबत परतलो.  इकडे पाहतो तर काय प्रशांत अधटराव व अनिकेत तमुचे यांचा पत्ता नाही.अखेर प्रशांत अधटराव पोचेल पण आमचे लेट लतीफ ("श्री हरी" फेम) अनिकेत तामुचे ११ वाजले तरी हजर नाहीत. आता अनिकेत बांधूना गाडी चुकणार हा दृढ निश्चय करून आम्ही गाडी पकडणार होतो. अखेर गाडी आली तरी अनिकेत बंधू परेल स्टेशनला, आमच रिजर्वेशन असल्याने आपल्या सीट पकडून आम्ही अनिकेत बंधू वाटेत भेटतील तिथून उचलायच्या इराद्याने बाहेर डोकावू लागलो शेवटी अनिकेत बंधुन गौरी-शंकर मिठाईवाला इथून उचलले आणि एकदाच सुटकेचा निश्वास टाकला आम्ही आणि त्या एस टी च्या ड्रायवर आणि कंडक्टरनी…
पुढे एस टी चा प्रवास सुरु झाला. मग  नेहमीप्रमाणे मी मग्न झालो आत्म चिंतनात  आणि इतर दुर्गवीर हशा आणि टाळ्यांनी सजलेल्या विचार मंथनात……. 
(वेळेअभावी संक्षिप्त लिखाण पुढचे भाग लवकरच….…)

Tuesday, 29 October 2013

माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस….


माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस….
इतिहासाचे अवघे एक ग्रंथालय माझ्या शेजारी स्थानापन्न होते आणि ओघव वक्तृत्व शैलीने येणा-या प्रत्येक व्यक्तिला मंत्रमुग्ध करून टाकणारे एक अचाट व्यक्तिमत्व…निमित्त होते शिवगौरव महोत्सव - २०१३ (ठाणे)
आमच्या दुर्गवीर परिवाराच्या गडसंवर्धन मोहिमांचे छायचित्र प्रदर्शन या कार्यक्रमात होते. आम्हा दुर्गवीरांचे अहोभाग्य हेच कि आमच्या अगदी बाजूलाच श्री आप्पा परब यांचे पुस्तक विक्री केंद्र होते येणा-या शिवप्रेमींना श्री आप्पा परब इतिहास उलगडून सांगत होते. आणि तिथे असणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होत होता.
इतिहासाविषयी जाणून घेऊन लिहिणारे खूप लेखक आहेत परंतु इतिहास जगून त्यावर लिखाण करणारे श्री. आप्पा परब…. श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचे एक सर्वोच्च शिखर, जे कितीही सर करा अधिकाधिक तुम्हाला त्यात गुंतवत जाईल.  श्री आप्पा परब एकदा एखाद्या विषयावर बोलायला लागले कि आपण फक्त ऐकत राहायचे.  श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचा एक अखंड झरा कि ज्याला पाझर फुटला कि तो अविरतपणे वाहत असतो. शनिवार अर्धा दिवस आम्ही दुर्गवीर श्री आप्पा परब यांच्या सहवासात होतो. जेव्हा मोगरा फुलतो तेव्हा त्याचा सुवास दरवळतो तसाच श्री आप्पा परब हे बोलू लागले कि फक्त दरवळतो तो "ज्ञानाचा सुगंध"…. असाच काहीस वातावरण आम्ही अनुभवल शनिवारी शिवगौरव महोत्सवात… 
पण मनात एक खंत होती कि इतक्या महान इतिहास संकलक  आणि महान व्यक्तीमत्त्वाची फारशी ओळख सर्वांपर्यंत पोचत नाहीय. आपल संपूर्ण आयुष्य इतिहास संकलनासाठी घालविणारे श्री आप्पा परब महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचायला हवे… श्री आप्पा परब वयाच्या पंच्यातरीत पोचले तरी स्वतः गड चढतात आणि इतिहास संकलन करतात तर आम्हा तरुणांना काय धाड भरलीय.खरच तरुणांनी आदर्श घ्यावा अस एक व्यक्तिमत्व श्री आप्पा परब…. 

Monday, 21 October 2013

रणरागीनि....
खबरदार जर उठेल नजर
संपशील तू या जागेवर 
पाहुनी या रणरागीनि चा अंगार
थरथर कापे गनीम क्षणभर 

हिंदू....
मान हिंदू , अभिमान हिंदू ।। 
या देशाची शान हिंदू, ।।
भगव्याचा पाईक हिंदू ।।
या भगव्यास फडकवे हिंदू ।। 
या म्लेच्छाचा काळ हिंदू ।।
स्वराज्याचा तारणहार हिंदू ।। 
या तलवारीची पात हिंदू ।। 
गनिमावर वज्रघात हिंदू ।। 
आगीची ललकार हिंदू ।। 
वा-याची रफ्तार हिंदू ।। 
सागराहून उत्स्फूर्त हिंदू ।। 
आभाळाहुनी अफाट हिंदू ।। 
दुर्गवीर चा धिरु

Thursday, 17 October 2013

पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........षंढ, नामर्द, आणि खान्ग्रेसी सरकारची पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........ सर्वत्र शेअर करा आणि एकत्र या.... 
सर्व काही भगव्यापायी अस म्हणत सह्याद्री च्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल त्यांना प्रथम अटक आणि नंतर गडावर भगवा लावण्याची मागणी केली म्हणून समज आपण नक्की कुठे राहतोय. भारतात कि पाकीस्थानात..... खरच आता या भगव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हर हर महादेव च्या जयघोषात गनिमावर तुटून पडायला हवे.... इथे गनीम फक्त आपल नामर्द सरकार आहे.... 
जय शिवराय!! 
जय शंभूराजे!! 
जय हिंद!! 
दुर्गवीर चा धिरु

Wednesday, 2 October 2013

एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री
एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री 

लाल बहादूर शास्त्री एक महान स्वातंत्र्य सैनिक. जय जवान… जय किसान….. चे प्रणेते. जन्म २ ऑक्टो. १९०४. बालपण आणि संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने  गेले.  ९ जून १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता. पुढे विदेश दौ-यावर असताना त्यांचा संशयासपद मृत्यु झाला.  संपूर्ण जगाला त्यांचा मृत्यु हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले, परंतु त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री व मुलगा सुनील शास्त्री यांच्या मतानुसार लाल बहादूर शास्त्रीवर विषप्रयोग झाला होता. यासाठी त्यांच्या स्वयंपाक्याला अटक करण्यात आली परंतु नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. ताश्कंद करावर सही कारण लाल बहादूर शास्त्रीना मान्य नव्हत पण त्यांना मजबुरीने त्यावर सही करावी लागली व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सदर बाबतीचा धक्का घेतल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा. आजपर्यंत भारत सरकार ने सुरक्षेचे कारण देऊन त्या घटनेचा अहवाल जगासमोर आणलेला नाही.  
असे हे उत्तुंग व्यक्तीमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी…. देशाचे पंतप्रधान असूनही कोणतीही संपत्ति त्यांच्या नावावर जमा नव्हती उलट कर्जच काढून ते घर चालवत. "जय जवान, जय किसान" असा अनोखा नारा देत त्यांनी जवान आणि किसान हेच देशाचे भविष्य असल्याचे देशाला पटवून दिले होते.
अश्या ख-या वाघाला माझे अंतरंगतून शतश: प्रणाम   
जय शिवराय 
जय हिंद 
दुर्गवीर चा धिरु 

"काळजी"स्वताची "काळजी" निदान त्यांच्यासाठी घ्या……
जे तुमची "काळजी" घेतात… 

Friday, 6 September 2013

अखेर सत्याचा विजय…


अखेर सत्याचा विजय…

काही महिन्यांपूर्वी श्री वसंत ढोबळे यांच्या फेरीवाल्याच्या विरोधातील पोलिस कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मॄत्यु झाला त्यास वसंत ढोबळे यांना जबाबदार धरून यांची बदली करण्यात आली होती. परंतु चौकशीअंती श्री ढोबळे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. एका जबाबदार पोलिस अधिक-याला अश्या पद्धतीने वागणूक मिळते हेच आपले दुर्दैव. दर आये पर दुरुस्त आये यानुसार अखेर वसंत ढोबळे यांना या खोट्या आरोपातून मुक्त करण्यात आले………। आणि अखेर सत्याचाच विजय झाला…
याबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री वसंत ढोबळे यांचे हार्दिक अभिनंदन
जय शिवराय

दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 21 August 2013

दर्शन शिवजन्मभूमीचेदर्शन शिवजन्मभूमीचे… 

दि. ११/८/२०१३ रोजी  आम्ही दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो.  तसे आम्ही वेळेत   निघालो, पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही साधारण ११ ते १२ पर्यंत जुइनगर रेल्वे स्टेशन ला बसून गप्पा मारत होतो ("मह्या" चा "महिमा" बाकी काय).  अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा "मह्या" प्रकट झाला.  आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पटकावली ("व्याकि" ची रिस्क नको म्हणून मी खिडकी पटकावली ) पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधूंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपून एक गडदर्शन.  तोवर सचिन बंधु फोन करून आम्ही कुठे आहोत याची खात्री करून घेत होतो.  पण आम्ही पहाटे पुण्यात पोचणार होतो त्यामुळे त्यांना आम्ही झोपायचा सल्ला दिला त्यानंतर आम्ही जवळपास सर्वच चिंतनात मग्न झालो. मध्येच एके ठिकाणी काळोखातील फ्राईड राइस खाउन पुढचा प्रवास सुरु झाला. शेवटी एकदाचे पहाटे पहाटे सचिन बंधूंच्या घरी पोचलो.  त्यांच्या एका खोलीत आम्ही सर्व जागा मिळेल तसे आडवे तिडवे झोपी गेलो.  सकाळी ७च्या दरम्यान झोपेतून उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली.  श्रमदान मोहीम नसल्याने सर्व अगदी आरामात उठत होते.  इकडे सचिन बंधूनी पहिल्या टप्प्यातील चहा दिला आणि त्यानंतर इडली-चटणी चा नाष्टा येणार होता.  त्यामुळे आम्ही सर्व दातांना धार काढून बसलो होतो.  इकडे नाश्ता तयार झाला.  सर्वांनी दे दणादण इडली चटणी वर तावून मारला. नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे दुर्गवीर ची एक बैठक आटपून पुढे हडसर गडदर्शन मोहीमेचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार आम्ही पुढे निघालो जुन्नर च्या दिशेने. शिवनेरी च्या पायथ्याशी आमचे दुर्गवीर बंधू स्वरूप पुरवंत यांच्या निवासस्थानी आम्ही जायला निघालो. तिथे आम्ही थोडा विश्राम करून चहापान करून पुढे निघालो किल्ले हडसर च्या दिशेन.  खूप लांबवरचा पल्ला पार पाडत आम्ही किल्ले हडसर च्या पायथ्याशी पोचलो पण पायथ्याशी पोचायलाच  इतका वेळ गेला होता कि गड चढाई व पुन्हा परतीचा प्रवास याचे नियोजन काही जमत नव्हते. मग आमच्या प्रशांत वाघरे बंधूनी आणलेली चकली आणि स्वीट थोड थोड वाटून खात आम्ही गड सर करायचा कि परत जाउन शिवनेरी दुर्गदर्शन मोहीम पार पाडायची याचा आम्ही विचार करीत होतो. तेव्हा तिथे काही गावकरी भेटले त्यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला कि पावसाळ्यात चढाई करण्यासाठी हा गड थोडासा धोकादायक आहे शिवाय आम्हाला लवकरच परतीचा प्रवास करायचा होता.  शेवटी आम्ही गावक-यांचा सल्ला मानत परत निघालो खर तर सचिन बंधूंचा थोडासा हिरमोड झाला परंतु त्यामुळे त्यांना पुनच्छ शिवनेरी चे दर्शन होणार होते.  मग ठरलं आम्ही माघारी फिरत पुन्हा शिवनेरी गडदर्शन करायचं ठरवलं.  

ठरल्याप्रमाणे आम्ही किल्ले शिवनेरी च्या दर्शनास निघालो मनात खूप औस्तुक्य होत कि आपण शिवजन्म भूमीचे दर्शन घेणार आहोत.  प्रथम पोचलो शिनेरीच्या पायथ्याशी मनात हुरहूर होती कारण दर्शन होणार तो त्या पावन भूमीच… गडाची चढाई सुरु झाली साधारणपणे कोणताही गड चढाई करतान मन भरून येते त्या शिवकाळाच्या,  शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या आठवणीने. सतत स्वराज्याचे राजे अन शिलेदार आजूबाजूला आपल्या दिमतीला असल्याचा भास होतो.  पण शिवनेरी च्या पायथ्यापासूनच मन अक्षरश: पिळवटून निघत होत. आजूबाजूला एखाद्या गार्डन प्रमाणे झालेलं बांधकाम अक्षरश: या अमुल्य ऐतिहासिक ठेव्याचा अपमान करतय कि काय अस उगाचच मला वाटत होत.  दोन्ही बाजूना सिमेंटीकरण आणि परदेशी झाडांची लागवड!!! का? कशासाठी? एवढ्या पवित्र स्थळाचा काय हा बाजार मांडला होता? ज्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे होते त्याच जीर्णोद्धार / नुतनीकरण कशा करिता? खर तर त्याच संवर्धन व्हायला हव? नुतनीकरण नाही!! पुढे गेलो महादरवाजाजवळ तिथे काहीतरी चुकतंय अस वाटत होत नंतर लक्षात आल मूळ दरवाजा साधारण गोमुखी असावा (असा माझा अंदाज आहे) पण त्यात खुपसा बदल करून तो निमुळता बनविला गेलाय.  का कुणास ठावूक मला त्याक्षणी वढू तुळापुर मोहिमीची आठवण झाली.  त्यावेळी तुळापुर या पवित्र ठिकाणाची होत असलेली अवहेलना पाहून मन असच चूकचुकले होते. पुढे गेलो तर दोन्ही बाजूना लोखंडी बार लावलेले.  पुढे काही ठिकाणी विजेचे खांब उभारलेले, तर कुठे काही लोक सहलीला आल्यावर गार्डन मध्ये बसल्याप्रमाणे बसून डबे खात होते. खिन्न मुद्रेन आम्ही सर्वजण पुढे जाऊ लागलो. जाताना आजूबाजूला एका पवित्र स्थळाच होत असलेल विडंबन पाहत पुढे जाऊ लागलो.  पुढे शिवजन्मभूमी जे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान मानले जाते व याच सुवर्णमयी क्षणाची आठवण म्हणून उभारण्यात आलेली एक शिवजन्माची आठवण. खर तर ती जागा डोळ्यात साठवून ठेवण्याजोगी होती म्हणून आम्ही त्याच्या समोर उभे राहून त्या जागेला डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो, पण त्यात हि खोड्या करणारे भेटलेच.  त्या वास्तूच्या खिडकीत बसून, पाय ठेवून फोटो काढणारे महाभाग हि होते.  तिथे डोक्यात अशी सणक गेली कि एकेकाला धरून धरून आपटावे.  अरे एवढी पवित्र जागा आणि तिथे पाय काय ठेवताय, बसताय काय…. अरे आपल्या सर्वांसाठी ते पवित्र मंदिरा प्रमाणे होते त्याची हि अशी विटम्बना.  या जागेच्या पायरीशी बसून तेथील शांत वातावरणात शिवरायांचे अस्तित्व अनुभवावे असे वाटले म्हणून आम्ही वर जाउन लागलो पण काय तिथेही या मुर्खांचा गोंधळ, आरडा ओरडा…. खरच आज जे काही मी पाहत होतो अनुभवत होत ते महाभयंकर होत.  जिथे शिवरायांच्या आठवणीने मन भरून यायला हवे तिथे त्या पवित्र स्थळाची होत असलेली अवहेलना पाहून मन हेलावून जात होते.  आम्ही त्या मुलाना समजाविण्यासाठी वरती गेलो तर मला तिथे अजून एक दृश्य दिसले तेव्हा मात्र माझा संताप अनावर झाला. एक तरुण FootBall घेऊन तिथे आला होता आता काय बोलणार . मी त्याला समजावले कि हि खेळायची जागा  नाहीय…. खरच जबाबदारीने हात बांधले आहेत नाहीतर ……… तिथून आम्ही निराश होऊनच खाली उतरलो.  पुढे त्यापेक्षा हि भयंकर एक तरुण तर चक्क दारू पिउनच आला होता त्याला स्वात:चा तोल सावरत  नव्हता इतका तो प्यायला होता.  मला सहन होत नव्हत नाईलाजाने मी तिथून निघालो. इच्छा असूनही मी तिथे काही करू शकलो नाही.  मी अगदीच दुबळा असल्याची मला जाणीव होऊ लागली.  शिवरायांचा, त्यांच्या पवित्र स्मृतींचा अपमान करणा-याविरोधात मी काहीही करू शकत नाही यापेक्षा लाजिरवाणी बाब माझ्या आयुष्यात नसेल.  पुढे मी एकाच गोष्टीचा विचार करत होतो, या जागेची होत असलेली विटम्बना पाहून राजेंना किती यातना होत असतील….हे सर्व पाहून गड उतरण्याच्या वेळेला एका तरुणाशी गाठ पडली तो तर चक्क सिगारेट फुंकत होता, प्रथम त्याला मी मराठीत समजावले पण कदाचित मी काय बोलतोय हे त्याला कळाले नसावे.म्हणून मी त्याला हिंदीत समजावले . त्यानेही जास्त न बोलता चटकन ती सिगारेट विझविली. पण दुर्दैव कि आपल्या फास्ट फूड वाल्या तरुणाईला सांगाव लागत कि हे गड-किल्ले तुमच्या पिकनिकसाठी नाहीत. हि मंदिर आहेत आपणा सर्वांची!!  त्यांना सांभाळा.  काय आणि किती बोलणार. या पवित्र स्थळांची होत असलेली विटम्बना आणि त्यामुळे मनाची होत असणारी घालमेल सहन करीतच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

परत आलो आम्ही स्वरूप बंधूंच्या घरी तिथे कांदे-पोहे, जिलेबी आणि कॉफी चा बेत होता. आम्ही सर्व अक्षरश: तुटून पडलो सकाळपासून पोटात अन्नाचा दाणा नव्हता त्यामुळे दाणे दाणे पे लिखा ही खाणे वाले का नाम या ओळींना सार्थ ठरेल असा नाश्ता केला (पण इथे दाणे पोह्यांचे होते हा!! ) इथे स्वरूप बंधू, त्यांचे आई-वडील, स्वरूप बंधूंच्या भगिनी यांचे आदरातिथ्य व त्यांचे वडिलोपार्जित घर (कित्येक वर्ष जून असे घर) पाहून आम्ही गडावर जे अनुभवल ते थोड्या काळासाठी विसरून गेलो. नंतर स्वरूप बंधू व कुटुंबियांशी थोडी चर्चा करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. 

शिवनेरी वरून निघताना मनात खूप प्रश्न होते!!  गडावर जपण्यासारखे खूप काही आहे पाण्याच्या टाक्या, त्याच्या बाजूला असलेली शिवलिंग, एका खडकात असेलेले खोदीव टाके, गडाच्या बाजूला लेणीसदृश्य वास्तू असे खूप काही मग त्या वास्तू जपण्याऐवजी गडावर इतरत्र नूतनीकरण कशासाठी???  ज्या वास्तूची धूळ मस्तकी घेऊन जीवनाचे सार्थक करायला हवे तिथे कसल्या पिकनिक काढायच्या? ज्या वास्तूतील पाणी सुद्धा अमृतुल्य असेल तिथे मध्यपान करून कस काय जाऊ शकतो? जिथे शिवशाहीची धून कानात गुंजायला हवी तिथे कसला हा गोंधळ आणि आरडा ओरडा… कधी थांबणार हे सर्व… 
परत निघताना मनात होती ती फक्त आणि फक्त "चीड"…………। 
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Friday, 9 August 2013

शंभू राजे


नुकत्याच वाचनात आलेल्या छावा कादंबरीतील शंभू राजेंच्या आयुष्यातील स्वकीयांकडून फसविल्या जाण्याच्या भावनेवर आधारित हे काव्य…(चूक भूल माफ असावी)


आयुष्याच्या धनुष्यातून बाण केव्हाच सुटलाय,
शब्दांच्या भात्यात फक्त एकटेपणा उरलाय,

सुटलेल्या बाणाने लक्ष्याचा वेध केव्हाच घेतलाय,
आता परिणामांचा फक्त पर्याय उरलाय.

स्वकीयांनी फसविण्याचा मला घाटच घातलाय,
गनिमांवरचा वार आज आप्तांवर उगारलाय.

आजवर प्रत्येक वार संयमाने घेतलाय,
आत्ता मात्र संयमाचा बांध फुटलाय.

विश्वासाच्या बळावर नात्यांचा डोंगर रचलाय,
विश्वासघाताच्या कंपनाने सारा डोंगर खचलाय

दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 7 August 2013

हसू आणि आसू @ मोहीम मानगड - भाग १

हसू आणि आसू -  भाग १

दुर्गवीर सोबतची माझी मानगड, खुर्डूगड मोहीम दोन वेगवेगळे अनुभव देणारी ठरली.  संपूर्ण प्रवासात मनमुराद हसविणारे हसरे असे आणि खुर्डूगड च्या जवळ असलेल्या प्राचीन मंदिर व वीरघळीची अवस्था बघून मन पिळवटून टाकणारे असे दुहेरी अनुभव आले . या  लेखात मी मनमुराद हसविणारे अनुभव मांडणार आहे.  
खर तर मी ट्रेन ने जाणार होतो पण ऐनवेळी प्रशांत बंधूनी जास्त रिस्क नको म्हणून मला कामावरून थेट दादरला येण्याचे आवाहन केले.  गाववाला असल्याने आवाहनाला प्रतिसाद देत मी दादर ला पोचलो.  तिथे  संतोष दादा, राज दादा, नितीन दादा अगोदर हजर होते. थोड्यावेळात गाडी आली ह्या वेळी गाडी जरा हाय-फाय होती (दिसायलाच हाय-फाय  बर का?). गाडीतून आशिष बंधू, प्रशांत बंधू, निहार बंधू आले.सोबत शिवरायांची सुबक मूर्ती होती.   पुढे प्लान थोडा चेंज झाला आणि प्रशांत बंधू ट्रेन ने जायला निघाले तेव्हा मला हि गाडीत करमत नसल्याने मीहि सोबत गेलो.(इथे गाववाला हा Criteria लागू होत नाही हा!!).   पनवेल ला दिवा रोहा आली तेव्हा अजून एक धक्का बसला. माझ्या माहितीनुसार ट्रेन मधून फक्त अजित दादा येणार होता. पण पाहतो काय!!  सचिन रेडेकर,  सुरज कोकितकर, आणि मुख्य म्हणजे दुर्गवीर चे "शाहीर" "हरी ओम" फेम अनिकेत तमुचे यांचे दर्शन झाले. सोबत दुर्गवीरांगणा ओजास्विनी पावशेहि हजर होत्या.  ट्रेन मार्गाला लागली, आमच्या गप्पा गोष्ठी सुरु झाल्या. माझ्या बाजूला सचिन रेडेकर बंधू होते त्यामुळे मी गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता. (तस माझ्या बाजूला सचिन रेडेकर ऐवजी सचिन तेंडूलकर बसला तरी मी काय बोलणार…) एका बाजूला शाहीर अनिकेत तमुचे, ओजस्विनी ताई आणि सुरज बंधू यांच्यात ऐतिहासिक विषयांवर चर्चा चालू होती. मी अधून मधून आगंतुक पाहुण्यासारखा त्यांची चर्चा ऐकत होतो.  दुस-या बाजूला प्रशांत आणि अजित दादा यांची शाळेतील गमती जमती वर चर्चा चालू होती.  त्यांच्या चर्चेतून मी Their आणि There यातील  फरक कसा ओळखावा याच ब्रम्हज्ञान शिकलो आणि त्यावर आम्ही मोहीम संपेपर्यंत हसत होतो. ते ज्ञान काय होते ते तुम्हाला प्रशांत आणि अजित दादा देतील.  नंतर एकदाचे पोचलो नागोठणे ला तिथून डेपो मध्ये जाण्यासाठी आणि तिथून पुढे जाण्यासाठी धडाम-धुडूम एस.टी. पकडायची होती.  डेपोत येणारी प्रत्येक एस.टी. आपल्यासाठी असा गैरसमज करून घेत आम्ही येणा-या प्रत्येक एस.टी. कडे धावत जात होतो. नंतर आम्हाला जाणीव झाली कि एस.टी. महामंडळाचे जावई नाही तेव्हा एस.टी. हि तिच्या वेळेवर येणार. नंतर आलेली एस.टी. पकडली आणि चक्क आम्हाला बसायला जागा मिळाली कारण नागोठणे वरून येताना आम्ही मिळेल त्याजागेत बसून जागा मिळवली होती अर्थातच त्यावेळी आमच्यापैकी एकालाही जागा मिळाली नाही. पण डेपोतून पकडलेल्या एस.टी.त आम्हाला बसायला जागा मिळाल्याने आम्ही सर्वजण निवडणुकीचे तिकीट मिळालेल्या उमेदवारासारखे खुश झालेलो.  शेवटी एकदाचे पोचलो गावात तिथे आमची हाय-फाय गाडी मागून आली.  आता काही लोकांनी  पुढे जायचं हे ठरल आम्ही गाडीने पुढे गेलो दुर्गवीर रामजी कदम यांच्या घरी, तिथे  मूर्ती उतरून ठेवली, रात्री साठी आवश्यक चादरी घेऊन आम्ही गावातील एका शाळेत विश्रामासाठी गेलो. तिथे भाकरी, चटणी, लोणच, फरसाण, शेंगदाणे अश्या आगळ्या वेगळ्या जेवणावर आडवा तिडवा हात मारत आम्ही जेवलो आणि चादरींची ओढाओढ करून झोपी गेलो. या चादरींच्या ओढाओढीत आमच्या निहार बंधूंची ७फुट X ३ फुट असलेली चादर साधारण  ८फुट X४ फुट झाली असावी.  रात्री मध्येच अमित शिंदे आणि प्रज्वल पाटील आले, तेव्हा तर गनीम आले कि काय या अविर्भावात मी उठून बसलेलो पण स्वकीय आहेत हे समजून निश्चिंत झोपलो. पण शेवटी प्रज्वल बंधूनी आमच्या चादरीवर आक्रमण केलेच. पण मीही त्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिल. शेवटी सकाळी अजित दादा आणि संतोष दादांनी सर्वांना उठविले.  थोड फ्रेश होऊन आम्ही मानगड सर करायला निघालो. 
गडावर जाताच संतोष दादाच्या योजनेनुसार मुख्य दरवाजाच्या ठिकाणी काही पाय-या जमिनीत गाडल्या गेल्या होत्या त्या बाहेर काढणे, दरवाज्यात पडलेल्या मोठ्या शीळा बाजूला करून वाट मोकळी करणे, हे आजच्या मोहिमेचे उद्दिष्ट होते.  त्यानुसार आम्ही श्रमदानास सुरुवात केली.  दादाने आम्हा सर्वाना काम विभागून दिली.  जड माणस जड दगड उचलण्यासाठी वेगळी केली गेली. मी, प्रश्नात वाघरे सचिन रेडेकर, अमित शिंदे दगड उचलू लागलो.  प्रशांत बंधू हाडाचे इंजिनिअर असल्यामुळे ते दगड वर चढविण्यासाठी कुठून कुठे उचलून  ठेवायचा हे सांगत होते त्यानुसार आम्ही ते दगड उचलत होतो.  कधी कधी आम्ही २-३ जण मिळून एक दगड वरती मोठ्या मुश्किलीने नेत होतो. वर गेल्यावर सचिन रेडेकर अगदी सहजतेने ते दगड एकट्याने नेत होते. कदाचित त्या दगडांनाहि लाज वाटली असेल सचिन दादांचा तो अवतार बघून.  इतके वर्ष ज्यांना कोणी जागेवरून किंचितही हलवू शकले नाही त्या दगडांना सचिन बंधू एकट्याने बाजूला करीत होते.  बाकीचे दुर्गवीर आजूबाजूची माती काढून एका ठिकाणी जमा करीत होते. त्यात दुर्गवीरांगणा ओजास्विनी ताईहि मागे नव्हत्या. मध्येच आलेल्या उपमावर यतेच्छ ताव मारून पुन्हा जोमाने कामाला लागलो.  हा हा म्हणता बरेचसे दगड आणि माती आम्ही बाजूला काढली होती. अधून मधून शिवरायांचा जल्लोष चालला होता.  अजूनही खुर्डू गडच्या पायथ्याशी असेलल्या पुरातन मंदिराला भेट द्यायची होती म्हणून गडावरची हि मोहीम आटोपती घेतली. श्रमदानाच सर्व साहित्य धुवून थोड फ्रेश होऊन मारुतीरायाला, शिवरायांना आणि मानाच्या मानगड ला वंदन करून गड उतरायला सुरुवात केली.  तिथूनच खुर्डूगडाच्या जवळ असलेल्या मंदिराच्या दिशेने जायला निघालो. या मंदिरात आम्ही काय अनुभव घेतले ते दुस-या लेखात मांडेनच 
मंदिरातून जाउन आल्यावर आम्ही परतीचा प्रवास  करणार होतो . त्यागोदर आम्ही एके ठिकाणी चहापाना साठी थांबलो. तिथे स्थानिक पत्रकार दुर्गवीर रामजी कदम यांनी खुर्डूगड च इतिहास सांगितला.  बरचसा इतिहास व संदर्भ माझ्या  लक्षात नाहीत.  पण या खुर्डूगडा वर असणा-या एका गुहेत एक तपस्वी साधू होते त्यांनी बाजी पासलकर यांना एक बाण दिला आणि सांगितले कि हा बाण ज्याच्याकडे राहील त्याचे नाव त्याच्या पराक्रमाने चंद्रसूर्य असेपर्यंत सर्वाच्या स्मरणात राहील, त्यांनी  बाण छत्रपती शिवाजी महाराजांना दिला, अजूनही तो बाण सातारा येथे आहे.  मोघलानी जेव्हा या परिसरात आक्रमण केले तेव्हा येथील गाव, मंदिर उध्वस्त केली येथील गावांच्या नावाचा बदल करण्यात आला. उदाहरण घ्यायचे तर निजामपूर, मशीदवाडी हि गाव त्या मोगली आक्रमणाची बळी पडलेली गाव आहेत. 
त्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो एक तुकडी गाडी ने आणि दुसरी तुकडी ट्रेन ने जायचं अस ठरलं. त्यानुसार मी, अजित दादा, प्रशांत वाघरे, अनिकेत तमुचे, ओजास्विनी पावशे आम्ही सर्व ट्रेन ने निघालो. माणगाव स्टेशन ला ट्रेन पकडली तेव्हा ती  "मांडवी एक्सप्रेस" होती पण ठाणे ला उतरे पर्यंत मला ती "बैलगाडीच" वाटली.  असा हा बैलगाडीचा प्रवास करत आम्ही रात्री उशिरा घरी पोचलो.  या संपूर्ण मोहिमेत अश्या प्रकारे आम्ही अनुभवले मनमुराद  क्षण…… 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Thursday, 1 August 2013

किल्ले सुरगड


किल्ले सुरगड तालुका रोहा, गाव खांब येथे वसलेला एक गड घेरा सुरगड या नावाने ओळखला जातो. रोहा - कोलाड - खांब - वैजनाथ (एस. टी. / सहा आसनी रिक्षा) २० कि.मी. अंतर. पायथ्यापासून अंतर २५० मीटर. मध्यम चढाई श्रेणीचा हा गड. या गडावर चढाई करण्यासाठी खांब गावातून दोन मार्ग आहेत पहिला मार्ग चढताना मध्येच एक दगडी घळ चढून जावे लागते. हि घळ पार करणे थोड कठीण आहे परंतु दोरीच्या साहाय्याने हि घळ पार करता येते. दुसरा मार्ग या घळीच्या सभोवती फेरा मारून गेल्यावर आहे. घळ येण्यापूर्वी डाव्या बाजूला इंजाई देवीचे मंदिर आहे. सध्या इथे मंदिराचे अवशेष व मूर्ती बाकी आहे. घळ पार केल्यावर म्हणजेच दक्षिणेकडून पुढे गेल्यावर गडावर जाण्यापूर्वी वाटेत एक मारुती शिल्प आहे या मारुतीच्या कमरेला खंजीर लावलेला आहे. सध्या या शिल्पाची अवस्था थोडी वाईट आहे. पुढे एक धन्य कोठार आहे. माथ्यावरून उत्तरेकडे गेल्यावर हेमांडपंथी मंदिराचे अवशेष आहेत तिथे पूर्वी तिथे शिवमंदिर होते असे मानले जाते. गडावर किमान १४ टाक्या आहेत संशोधन केल्यास अजूनही टाक्या मिळण्याची शक्यता आहे. वरती एक बुरुज आहे व अरबी व फारसी भाषेतील एक शिलालेख आहे. या शिलालेखावर सुरगड असा स्पष्ट उल्लेख आहे. आज गडाची अवस्था फारशी चांगली नाही. ,आणि म्हणूनच दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई, चे अध्यक्ष संतोष हसुरकर यांच्या संकल्पनेतून आणि दुर्गवीर च्या सर्व ज्ञात - अज्ञात शिलेदारांनी एकत्र येऊन ५ फेब्रुवारी २०१२ रोजी सुरगड श्रमदानास सुरुवात केली.
मुंबई आणि पुणे येथून अनेक शिवप्रेमींनी येथे येउन कित्येक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. पुण्याच्या शिवप्रेमी / गडप्रेमीना एकत्र करण्याचे काम दुर्गवीर चे पुण्याचे शिलेदार सचिन जगताप व प्रदीप पाटील यांनी उत्कृष्टरित्या पार पडले आहे. दुर्गवीर परिवाराच्या आत्तापर्यंतच्या मोहिमांमध्ये टाक्यांची साफसफाई करण्यात आली. या टाक्यां मधील पाणी गडप्रेमीना वर्षभर पिण्यासाठी वापरता येते. टाक्यांच्या साफसफाई सोबत पायवाटेचे कामही करण्यात आले. दुर्गवीर च्या शिलेदारांनी गडाच्या परीसरात इतस्तत: पसरलेले भलेमोठे दगड उचलून वापरले. या पायवाटेच्या सहाय्याने कोणतेही दुर्गप्रेमी न चुकता गडमाथ्यावर पोहोचू शकतात. पायवाट व टाक्यांच्या शिवाय दुर्गवीर परिवाराने गडावरील मंदिराची बांधणी करण्याचे संकल्प आहे. मंदिराचे बांधकाम करताना कोणतेही सिमेंट चे बांधकाम करण्याचे दुर्गवीर ने कटाक्षाने टाळले. मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ दुर्गवीर च्या शिलेदारांनी अन्साई देवीच्या मंदिराचे काम सुरु आहे. या मंदिरा च्या बांधकामासाठी गडाच्या परिसरातील मोठमोठे दगड उचलून आणून रचण्यात आले. भविष्यात गडावरील शिवमंदिर, मारुती मंदिर बांधून पूर्ण करण्याचा मानस आहे.
दुर्गवीर च्या मुंबई च्या दुर्गवीर आणि वीरांगणानि हे गडकोट जपण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले आहे. गरज आहे ती तुम्हा सर्व शिवप्रेमींच्या सहकार्याची.
तुम्हाला या श्रमदान मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करा

संतोष हसुरकर :- 9833458151
अजित राणे :- 8097519700
नितीन पाटोळे :- 86558 23748
सचिन जगताप (पुणे) :- 9890662885
प्रदीप पाटील (पुणे) :- 9404137023
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/Durgveer.warasGadDurganch
https://www.facebook.com/groups/durgveer/
"दूर्गवीर प्रतिष्ठान"
नोंदणी क्रमाक: जि.बी.बी एस.डी.१६१३/२०१०
धोभी घाट, वाकोला ब्रिज,
सांताक्रुज (पू) मुंबई ४०००५५.
ईमेल: durgveer.com@gmail.com
santoshhasurkar@yahoo.com,


दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/ — 

Tuesday, 30 July 2013

सरस……. (गड)सरस……. (गड)

दि. २१. ७ . २०१३ रोजी दुर्गवीरचे अवघे ७ शिलेदार मिळून आम्ही सरसगड (पाली) येथे जायचे ठरविले . सकाळी ६:२०मि. ट्रेन दिवा  स्टेशन येणार होती.  नितीन दादा तर सकाळी ४:३० पासूनच संपर्कात होते. प्रश्नात वाघरे बंधू अनफिट असल्याने त्यांनी माघार घेतली होती.  कोणं कोण येणार याची फार मोठी उत्सुकता होती. राज, सुरज, नितीन हे येणार इतक पक्क होत.  सकाळी समजल "अल्लाउद्दिन चा जीन" (हर्षद मोरे ) येणार आहेत मी आणि हर्षद बंधू दिवा ला भेटलो. बसायला जागा कुठे दिसत नव्हती जरा पुढे गेल्यावर जागा दिसली लगेच तिथे स्थानापन्न झालो पण नशीब खराब आमच गाडी अर्धा तास लेट, मग काय सुरुवात चिंतनाला त्यात समजल आमचे डोंबिवली चे धष्टपुष्ट व्यक्तिमत्व प्रशांत अधटराव बंधू येतायत त्याचं नशीब चांगल गाडी लेट झाली म्हणून मिळाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर  माझे चिंतन सुरु झाले आणि प्रश्नात व  हर्षद बंदुंचे "निरीक्षण" सुरु झाले. शेवटी गाडी पोचली पनवेल   ला तिथे नितन, राज, सुरज, अजित कोकीतकर बंधू आमच्यात  सामील झाले.  पुढे हर्षद बंधूनी आणलेल्या इडली चटणी वर यतेच्छ ताव मारत गप्पा गोष्टी करत पोचलो एकदाचे नागोठणे ला तिथून टमटम ने पोचलो सरसगड च्या पायथ्याशी.   आज मात्र पावसाने चांगलीच दांडी मारली होती. पाउस नसल्याने मस्त रमतगमत निसर्ग न्याहाळत आम्ही गडाची चढाई सुरु केली. आमचे हर्शल बंधू हळूहळू जरा जास्तच निसर्ग न्याहाळत गड चढत होते.  पुढे उभ्या काताळात पाय-या आहेत त्या पार करायच्या होत्या अगोदर विचार केला पाय-या त्या तर रोजच चढतो.  आम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये जाऊ लागलो पण पाय-यावर असलेली शेवाळ त्यात काही पाय-या तुटलेल्या असल्याने घसरून थेट दरीत कोसळण्याची भीती त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स जरासा कमी झाला.  पण हार मानली तर दुर्गवीर कसले म्हणून आम्ही हळू हळू एकमेकांना धीर देत वर चढू लागलो दोन्ही बाजूना विशाल कातळ त्या काताळासामोर आपण जणू किसपटा प्रमाणे भासत होतो. वळून खाली बघितलं तर खोल दरी दिसत होती त्यामुळे वळून खाली बघण्याच्या फंदात न पडता आम्ही त्या पाय-या पार केल्या.  पाय-या पार केल्यावर गड सर केल्याच्या आनंदात जोरदार घोषणा दिल्या.  पाय-या पार केल्यावर दर्शन झाले सुबक आणि मजबूत महादरवाजाचे. इतक्या वर्षानंतरहि हा दरवाजा अभेद्य होता.  पुढे आमची चढाई सुरु राहिली. आजूबाजूचा परिसर न्याहाळत आम्ही निघालो. काही  निसरड्या ठिकाणी स्वताला सावरत आम्ही पुढे पुढे निघालो. वरून खाली पाहिल्यावर अफाट निसर्ग दिसत होता जणू काही स्वर्गच..... पुढे उजव्या बाजूने आम्ही पुढे चालू लागलो गडाला असलेला अभेद्य असा बुरुज न्याहाळत आंम्ही पुढे जाऊ लागलो.  पोटात फारस काही नसल्याने सगळे कधी एकदा जेवतोय असा विचार करतच पुढे जात होते. आम्ही सर्वजण प्रथमच सरसगड वर आलो होतो त्यामुळे वाट मिळेल तिथून पुढे चालत जात होतो.  जितका वेळ आहे त्यात सर्व परिसर पिंजून काढायचा असं आम्ही ठरवलं होत.  पुढे उजव्या बाजूने पुढे गेल्यावर पुढे उभ्या डोंगराला फेरा मारून पुढे जात होतो.  वाटेत येणा-या पाण्याच्या टाक्या, डोंगरात कोरलेल्या टाक्या आणि धान्य कोठार सदृश्य वास्तूंचे निरीक्षण करीत आम्ही पुढे जाऊ लागलो.  एका गुहेत काही ऐतिहासिक संदर्भ  नसताना अगदी व्हाईट सिमेंटने तयार केलेली ""हिरवी" वास्तू दिसली.  हि अशी "हिरवी शेवाळ" दिसली कि रक्त अक्षरश: खवळून उठत. पण दुस-या क्षणी आपण एक "दुर्गवीर" असल्याची जाणीव झाली आणि माझा संताप आवरून पुढे निघालो.  डोंगरात कोरलेल्या टाक्या व गुहा पाहून आंम्ही अचंबित व्हायचो.  पुढे आम्ही एका शिवमंदिराजवळ गेलो पण तिथली परिस्थिती फारच गंभीर होती. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी पाणी साचल होत मंदिराच्या गाभा-यात दीड - दोन फुट उंच पाणी साचल होत.पाणी आत आल्याने शिवपिंड पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. प्रथम दर्शनी आम्हाला वाटलं कि जास्त पाणी साचलं म्हणून आत शिरलं असेल म्हणून आम्ही दुर्गवीर च्या शिलेदारांनी ते पाणी बाहेर काढून गाभारा स्वच्छ करायचं ठरवलं.  बाजूला असलेला एक पत्र्याचा डबा घेऊन आम्ही पाणी उपसायला सुरुवात केली पण आम्हाला पुढच्या १० मिनिटात कळून चुकल कि आम्ही चुकीच्या ठिकाणी मेहनत करतोय.  मंदिराच्या एका बाजूने छोट्याश्या कपारीतून पाणी आत येत होते पण यावर काहीतरी कायमचा उपाय व्हावा अशी मनाची समजूत घालून आम्ही पाणी उपसायचं काम थांबवल.  नंतर त्याच पाण्यात उभे राहून भगवान शंकराची आरती आणि शिवरायांचा जयघोष करत आम्ही थोडी विश्रांती घ्याय़च ठरवलं.  सर्वांनी आपापले डबे काढून जेवणाला सुरुवात करावी अस ठरल. नेहमीप्रमाणे आमच्या नितीन बंधूनी "आईची माया" (राइस) आणली, आणि आमचे "अल्लादिन चे जीन" हर्षद बंधूनी चटणी आणि भाकरी काढली प्रत्येकाने आपापला वाटा काढून घेतला.  आमचे प्रशांत बंधूनी आपला वाटा घेऊन बाजूला गेले. नितीन बंधूनी आपला वाटा घेतला उरलेल्या वाट्यात मी, सुरज, अजित कोकितकर, राज बंधू adjust करणार होतो.  आम्ही ४जण आहोत हे पाहून हर्षद बंधूनी नितीन बंधूच्या वाट्यात adjust करायचा निर्णय घेतला पण हर्षद बंधूंचा हा निर्णय त्यांचा चांगलाच "अंगाशी" (पोटाशी) आला नितीन बंधूनी हर्षद बंधूना फारसा स्कोप न दिल्याने त्यांना अर्धपोटीच राहावं लागलं आम्ही चौघांनी मात्र adjust करून पोटाला ब-यापैकी आधार दिला.  आता वेळ होती दुर्गदर्शनाचा परतीचा प्रवास करण्याची पुन्हा आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.  येताना जसे आम्ही संपूर्ण परिसर न्याहाळत आलो तसच पुन्हा जाऊ लागलो.  जातां जाता आमचे अजित कोकितकर बंधूंची नजर डोंगरावर कोरलेल्या काही चित्रांकडे गेली. तस मी पण ते चित्र न्याहाळू लागलो.प्रथम एक हात दिसला जसा एखाद्या सती शिळे वर असतो नंतर एक धनुर्धारी व्यक्ती दिसली  (धनुष्य बाण ताणून धरलेली व्यक्ती दिसली) त्याच्या समोर अगोदर फक्त भाल्याच चित्र दिसलं.  हळू हळू राज बंधूनी त्यावर तिथल्याच एका पांढ-या दगडाने चित्र रेखाटल तेव्हा ते अजून स्पष्ट दिसू लागल. आता मात्र चित्र स्पष्ट दिसत होत एक धनुर्धारी धनुष्य ताणून असलेला त्याच्या समोर एक दुसरी व्यक्ती (स्त्री कि पुरुष याबाबत शंका होती) ज्याच्या हातात भाला होता. धनुर्धारी व्यक्तीच्या समोर एक प्राणी होता कदाचित कुठला तरी जंगली प्राणी असावा.  तो प्राणी धनुर्धारी व्यक्तीच्या समोर उभा होता पण त्याचे तोंड मागच्या बाजूला म्हणजे भाला धरलेल्या व्यक्तीच्या दिशेने होते.  नक्की तो प्राणी कोण आणि तो कोणावर हल्ला करत होता हे नीटस दिसत नव्हत.  कारण काही महाभागांनी तिथे पेंट ने स्वताच्या व स्वताच्या सौ (भविष्यात होणा-या सौ ) च नाव कोरून ठेवल होत.  खरच यांनी एवढे काय पराक्रम केलेत कि यांच नाव कोरल जाव.  त्यांच्या या (वि)कृतीने एक इतिहासाचा ठेवा आपण नष्ट करतोय याची थोडी सुद्धा कल्पना नसेल का त्यांना??? नंतर नितीन बंधूनी एका वहीवर ते चित्र नेमक कस असेल याचं एक अंदाजे चित्र काढल.  आणि नेहमीप्रमाणे आम्ही आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याच दुर्गवीर च शिवकार्य पार पाडत सरस गडाचा निरोप घेऊ लागलो.  
पुढे उतरताना आमचे हर्षद बंधू Seating पोझिशन मध्येच गड उतरले. मध्येच नितीन बंधूनी त्यांना कमरेवर हात ठेवून (विठ्ठला प्रमाणे ) चालावे मग Confidence वाढतो व चालताना आपला Balance जात नाही असा सल्ला दिला. पण अर्थातच हर्षद बंधूनी तो मानला नाही कारण नितीन बंधूंचाच पाय २-३ वेळा घसरला होता.असे आम्ही मजल दर मजल करीत हळू हळू सरसगड उतरलो. आणि "सरस" अशी "सरसगड" ची दुर्गदर्शन मोहीम "सरसपणे"  पार केली.  

सरसगड (पाली) च्या या मोहिमेत गडाच व आजूबाजूच्या परिसराच अप्रतिम सौदर्य,  गडावरील डोंगरातील कोरलेली अप्रतिम युद्धशिल्पांची चित्रे आणि त्या चित्राच्या माध्यमातून स्पष्ट होणारा आपल्या संस्कृतीचा सखोल इतिहास परंतु काही अविचारी / मूर्खांच्या चुकीमुळे नष्ट होत असलेला इतिहास, आणि पायांचा वापर न करता बसून गड कसा उतरावा हे हर्षद बंधूंचे प्रात्यक्षिक असे अनेक सरस अनुभव देणारी सरसगड हि एक यशस्वी दुर्गदर्शन मोहीम 
जय शिवराय 

Monday, 29 July 2013एक मोहीम "अवचीत" अशी……………

आज दि. २८/७/२०१३ रोजीची  दुर्गदर्शन मोहीम तशी दुर्गवीर तर्फे अधिकृत मोहीम नव्हती.  अवचीतपणे (अचानकपणे ) मोहीम ठरली ४-५ जाण्यासाठी तयार झाले गाडी तर जाणारच होती मग ठरलं किती वाजता निघायचं आणि कुठे भेटायचं.  शनिवारी संध्याकाळी ठरलं रविवारी सकाळी ५ वाजता सायन ला भेटायचं.  सकाळी मला जरा उशीर झाला पण माझ्यापेक्षा आमच्या स्वप्नील बंधूना उशीर झाल्यामुळे  माझ्या उशीरा जाण्याची फारशी बोंबाबोंब झाली नाही (चक्क मी वेळेत पोचलो उशिरा उठूनसुद्धा ). आम्ही ५:३० पर्यंत निघणार होतो पण आम्ही चक्क ७ वाजता प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या गप्पा रंगल्या आणि मग  आम्ही सर्व डोळे मिटून आत्मचिंतनात गुंग झालो.  प्रवास सुरु झाला तो थेट थांबला मेढा गावात तिथून मुख्य रस्त्यावरून पायी प्रवास करत आम्हाला जायचं होत.  मी, सुरज कोकितकर, राज मेस्त्री, सचिन रेडेकर, दुर्गवीरांगना ओजास्विनी पावशे आम्ही सर्व गडाच्या दिशेने निघालो आम्हा ५ जणांपैकी मी व राज दादा फक्त अवचितगड वर येउन गेलो होतो.  राज दादा फार वेळा आला नव्हता त्यामुळे त्याला वाट आठवत नव्हती.  माझा तर आनंदी आनंद होता कारण दर ४-५ दिवसांनी माझी मेमरी Format होते त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही कुठल्या वाटेने आलो हे मला आठवण्याचा प्रश्नच नव्हता.  शेवटच्या वेळी मी आणि चंद्रु गड जाताना बरोबर चढलो पण येताना जे चुकलो तेथेट रोहा येथे पोचलो होतो त्यामुळे या वेळी आम्ही विचारातच जायचं ठरवल आमच्या सुरज बंधूनी एका दुकानदाराला विचारल "अवचित कुठे?" एकदा ऐकू नसेल गेले म्हणून त्याने अजून दोन वेळा विचारले पण  त्याच्या चेह-यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह होते नंतर समजल त्या दुकानदाराला सुरज बंधूंची भाषा समजत नव्हती…शेवटी रस्त्यावरून जाणा-या एका आईनी सांगितली तेव्हा आम्ही मार्गाला लागलो मग रस्त्यात येणा-या प्रत्येकाला  "अवचितगड कुठे" हा आमचा एकच प्रश्न होता.  शेवटी आम्ही अवचितगड च्या पायथ्याशी असलेल्या भल्यामोठ्या विहिरीपाशी आलो.  तिथून मोठा प्रश्न (त्या विहिरीपेक्षा मोठा) आमच्यासमोर आ वासून  उभा राहिला समोर फक्त झाडं आणि रान याने वेढलेला डोंगर  दिसत होता आणि त्यात अवचित गड शोधायचा होता.  सुरज बंधूनी संतोष दादांना फोन करून कस जायचं याबद्दल विचारलं दादाचा एकच कानमंत्र "वरती जातांना उजव्या बाजूला वळा".  मग मोहिमेत सुरज कोकितकर बंधूआघाडीवर राहून पुढे चालू लागले  मी आणि राज दादा मागे होतो आणि मागूनच सुरज बंधूना सल्ले देत होतो (तसं सल्ले देण सोप्प असत आज काल जो तो उठतो तो सल्लेच देत असतो) असो असे फुकटचे सल्ले आम्ही सुरज बंधूना देत होतो सुरज उजवीकडे, सुरज इकडे, सुरज तिकडे असे आणि अनेक सल्ले देत आम्ही रमत गमत एका  ठिकाणी थांबत थोडसं खाउन पुढे जाऊ लागलो.  गडावर पोहोचेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी दगडावर काढलेले बाण दिसत होते तिथे आमचे सुरज बंधू "बाण बाण" करून ओरडायचे जणू काय त्यांनी "धनुष्यातला बाण" शोधून काढलाय शेवट पर्यंत सुरज बंधूना विचारायचं राहून बाण नेमका कुठला होता "रामायणांला कि महाभारतातला" शेवटी अगदी माथ्यावर पोचतोच तोच एक आजोबा भेटले त्यांच्याकडून खात्री करून घेतली गड इकडेच आहे ना…. शेवटी आम्ही पोचलो मुख्य दरवाजापाशी तेही न चुकता नाहीतर चुकण्याचा सर्वात जास्त अनुभव मलाच होता पण सुरज बंधूनी शेवटपर्यंत आघाडीवर राहून अवचितगड चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली. आता गडावरील वास्तूंची माहिती मला व राज दादा ला माहित होती.  आम्हा दोघांवर गडावरील वास्तूंची माहिती सांगायची जबाबदारी आली.  त्यात मी नेहमीच "खूप जास्त"  बोलतो (बोलतो कसला बडबडतो) म्हणून मी विचार केला आज राज दादांना चान्स देऊया बोलायचा. राज दादा माहिती सांगत जात होते आणि अधून मधून मला विचारायचे "हो ना धीरु" मी राज दादांना "हो" बोलून अनुमोदन द्यायचो.  राज सदर, शिवमंदिर, पाण्याची टाकी, तोफ अश्या वास्तू पाहत आम्ही गड दर्शन करू लागलो मग एके ठिकाणी बसून थोड जेवण(थोडच हा!! ) करायचा विचार केला.  राज दादाने आणलेले फरसाण आणि ओजास्विनी ताईनी आणलेले धपाटे आम्ही खाल्ले. आजवर संगणक शिक्षक असताना खूप विद्यार्थ्यांना "धपाटे" दिले पण हे असे "धपाटे" प्रथमच खाल्ले.शेवटी उरलेलं फरसाण आणि गोड लोणच अशी Instant Dish (शीघ्र थाळी ) ओजास्विनी ताईनी बनविली अगोदर आम्ही नाक मुरडली पण नंतर मस्त मस्त करून बोट चाटून, डबा चाटून Instant Dish (शीघ्र थाळी ) चा पदार्थ Instantली संपवला.  शेवटी आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आता परतीचा प्रवास करतान चुकलो तर थेट रोहा स्टेशन ला बाहेर येणार होतो.  पण यावेळी सचिन बंधूनी आघाडीवर जायचं ठरवलं मस्त मराठमोळी गाणी लावून सचिन बंधू पुढे चालू लागले. अगोदर ठरल्याप्रमाणे आम्ही डाव्या बाजूने जाऊ लागलो आणि चक्क न चुकता आम्ही गड उतरलो सुद्धा…उतरताना मात्र आम्हाला फार कमी वेळ लागला.  आघाडीवर भीमरूपी सचिन बंधू होते म्हटल्यावर उड्या  मारतच आम्ही सर्व उतरत होतो.  अखेर गड यशस्वीरीत्या उतरलो. खाली आल्यावर जेवणाचा पत्ता नव्हता मग आम्ही थोड फरसाण, बिक्सिट खाउन भूक भागविली.  नंतर आमची परतीची तयारी सुरु झाली.  गाडी निघाली मुंबईच्या दिशेने थोड्या गप्पा आणि खूपस आत्मचिंतन करत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
आज ख-या दृष्टीने "अवचित"पणे ठरलेली मोहीम अगदी यशस्वीरित्या पार पडली……
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Friday, 19 July 2013

माझे वचन


(आता या प्रेमवीराच लग्न त्या मुलीशी ठरलय... आता लग्नानंतर तो तिला काय काय देणार ते तो सांगतोय या काव्यातून...)माझे वचन
लग्न घटिका हि जवळ आली,
तसा मनाने मी बावरलोय ग 
तुझी आठवण जशी आली 
तसा मी सावरलोय ग..

वचन देतो आज तुला
प्रेमाने ओंझळ भरेन तुझी,
ना आयुष्यात भासणार तुला
उणीव कुणा आपल्या माणसाची

प्रेम म्हणतात ते देईनच तुला
कारण तूच त्याची खरी हक्कदार
तुझे स्वप्न काय तू सांग  मला
नक्कीच करेन ते मी साकार

लग्नाचे हे नाते आपुले
अतूट असेल नेहमी 
जणू चंद्राला तारे लाभले
तशी साथ असेल तुला नेहमी

 

Monday, 15 July 2013

प्रेम जिंकल

प्रेमाचे मागणे घातले ती रुसली पण नंतर तिने मागणे मान्य केले आणि त्यावेळी या प्रेम वीराची काय अवस्था होते ती पाहूया...)
प्रेम जिंकल

आज आकाशहि ठेंगणे वाटे, 
सर्व जगाच मी राजा भासे 
तुझ्या एका सुंदर होकाराने 
सारे जगच सुंदर दिसे 

रुसून जेव्हा गेलीस,
तेव्हा मन होते थोडे घाबरले,
बघून मला जेव्हा हसलीस,
तेव्हा कुठे ते सावरले,

जिंकलय आज खूप काही
आता कशाचीच आशा नाही
तुझ्यासोबत आयुष्य जगावे,
हिच आता आयुष्याची आस असे.


शब्द देतो प्रिये तुला,
विश्वास तुझा वाया जाणार नाहि 
उरले आयुष्य मी आता,
तुझ्याशिवाय जगू शकणार नाही...

 

Friday, 12 July 2013

शायरीदुनिया का दस्तूर है ये………….
सब हसते है उनके जाने पर,
जो सबको है रुलाते…
सब रोते उन के जाने पर,
जो सबको है हसाते

दुर्गवीर चा धिरु 

Wednesday, 10 July 2013

प्रेमाची कबुली

 (दुरूनच आपल्या प्रेयसीला न्याहाळनारा मैत्री तोडेल म्हणून प्रेमाची कबुली न देणारा "तो" आता एकदाच तिला मागण घालतोच तेव्हा आणी त्यानंतर काय होत रे पहा..)


प्रेमाची कबुली 

गमावेन तुला म्हणून मी 
किती स्वतास आवरले
पण आज धीर करून मी
आज तुला मागणे घातले

हसता हसता अचानक तू
स्तब्ध तू का झालीस
माझ्या चुकीची शिक्षा म्हणून
मैत्री का तोडलीस

सांग प्रिये काय तुझ्या मनात
अबोल्यातिल हा तुझा होकार कि नकार
नसेल माझे प्रेम मान्य तर
नको तोडू मैत्रीचा आधार

प्रिये सहन नाही होत हा
तुझा जीवघेणा अबोल
संपलोय तुझ्या शिवाय मी
हा प्राण कंठाशी आला

दुर्गवीर चा धीरु 
प्रकाशनाचे प्रथम हक्क http://www.premrang.com/ कडे)
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Monday, 1 July 2013

स्त्रियांसाठी उखाणे - 1

भिंतीवर घड्याळ अन
घड्याळाला काटे
...... रावांच नाव घेताना, 
बाई लाज मला वाटे..

http://dhiruloke.blogspot.in/
http://www.premrang.com/

प्रेमाचा ओलावा

(त्या लांबून पाहणा-या मुलाची त्या मुलीशी मैत्री झालीय पण हा प्रेमवीर सांगायची हिम्मत करू शकत नाही कारण तिला राग आल तर ती मैत्री तोडेल मग त्याची काय अवस्था होतेय ती बघा...)प्रेमाचा ओलावा 

तुझे ते मोहक ते मोहक हसणे,
करती घायाळ हृदय माझे,
क्षणात होते जे माझे,
ते क्षणात का होई तुझे

भुरभुरती या तुझ्या बटांना,
हलकेच मागे करावे म्हणतोय मी,
गमावेन तुझी मैत्री म्हणून
तसाच मागे सरतोय मी

हसून तुझे टाळी देणे,
अंग अंग शहारून टाके
प्रेमाचे घालावे गा-हाणे
तर भीती शब्द गोठवून टाके

कधीतरी प्रेम उमजेल तुला,
म्हणून मैत्री आपली जगतोय मी,
प्रेमाची न सक्ती तुझ्यावर
मैत्रीत सतत तुला जपेन मी

दुर्गवीर चा धिरु
(प्रकाशनाचे प्रथम हक्क http://www.premrang.com/ कडे)
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Friday, 28 June 2013

ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा


ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा  
या फोटोत दिसणा-या दोन व्यक्ती आजवरच्या माझ्या आयुष्यातील २ वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय / आदर्श व्यक्ती. 
प्रथम दोन्ही व्यक्तींची ओळख डावीकडील संतोष दादा दुर्गवीर प्रतिष्ठान (परिवार) चे अध्यक्ष पण ते आमच्या सर्व दुर्गवीर आणि वीरांगणांसाठी "संतोष दादा" आणि उजवीकडील श्री. धन्वी सर घेरासुरगड च्या पायथ्याशी असलेल्या खांब गावातील "नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री रामचंद्र गणपत पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब"  या शाळेतील एक शिक्षक 

प्रथम संतोष दादा बद्दल, माझी आणि संतोष दादाची पहिली भेट २६ फेब्रुवारी २०१२  सुरगड मोहिमेच्या वेळी.  आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री संतोष दादा मारुती मंदिरात दुस-या दिवशीच्या मोहिमेत काय काय काम करायचं हे सांगत होता.  ते ऐकताना मला स्वताला जाणवत होत कि, बस हेचे ते शिवकार्य  जे आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे.  दादाचा एक एक शब्द मी मन लावून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात अस कुठे जाणवत नव्हत कि आपल्याला संस्था मोठी करायचीय; त्याच धेय्य स्पष्ट होत "गडसंवर्धन आणि शिवकार्य" त्यात  कुठेही खोटेपणा जाणवत नव्हता.  प्रत्येक मोहिमेनंतर दादाने प्रत्येक दुर्गवीर शिलेदाराला दिलेली कौतुकाची थाप एका योग्य "प्रमुखाच" लक्षण होत. प्रत्येक मोहिमेत दादा असतोच. मोहिमेअगोदर प्रत्येक गोष्टीची आखणी करणे आणि मोहिमेवेळी त्या गोष्टी अमलात आणणे हि दादाची तारेवरची कसरत दुर्गवीर चा प्रत्येक शिलेदार पाहत असतो.  कधी कधी प्रकृती संतोष दादा ला हे कार्य करण्यापासून थोपावते, पण थांबेल तो शिवरायांचा मावळा कसला हा विचार करून दादा जोमाने कामाला लागतो.  आजवर दादासोबत कितीतरी "शिवप्रेमी" या कार्यात येउन गेले सुद्धा असतील, पण दादा कधी थांबला नाही कोणी नाही तर "एकाला चलो रे" या पक्तीनुसार दादा चालत राहिला.  कोणालातरी वाटेल यात संतोष दादा ला काहीतरी फायदा असणार!! बरोबर आहेत ते……  आहे ना दादाला खूप मोठा फायदा आहे!  तो म्हणजे "शिवकार्य केल्याचा आनंद" "हे गड राखण्यासाठी उचलेल्या आपल्या खारीच्या वाट्याचा आनंद" हा फायदा जर एखाद्या Balance Sheet मध्ये घेतला तर Assets च जास्त होतील त्या पण Fix Assets (Commerce च्या लोकांना समजलेच असेल) दादा सोबत काम करताना एक जाणवलं दादा ला एखाद्या व्यक्तीचा राग आला तरी तो बोलून दाखवत नाही कारण त्याला माहित असते "जर एखाद्या व्यक्तीचे एक गोष्ट चुकत असेल तरी त्याने बरोबर केलेल्या गोष्टीनां नाकारता येत नाही" (मी दादाची शिवरायांशी तुलना नाही करत) पण "शिवरायांनी प्रत्येक मावळ्याच्या चागल्या गुणांचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला त्याच्या दोषांवर पांघरून घालत" पण त्यासोबतच शिवराय अक्षम्य चुका करणा-याला दंडही करत हे लक्षात घ्यायला हवे.  कदाचित दादा एखाद्याच्या दोषांवर पांघरून घालतोय याचा अर्थ त्याला काही समजत नाही अस नाहीय ना!  खर तर माझ्याकडूनही खुपश्या चुका झाल्या तेव्हा मलाही वाटायचं माझ्या या चुकीमुळे माझा दुर्गवीर परिवारातील मधील प्रवास संपतोय कि काय? पण दुस-याच दिवशी संतोष दादाच फोन येतो आणि दादाचा आवाज येतो "काय धिरु काय चाललय?" आणि माझा जीव भांड्यात पडतो.  असा आमचा दादा कितीही काही झाल तरी शिवकार्यात कुठेही कमीपणा पडू देत नाही. आज दुर्गवीर परिवार तर्फे गडसंवर्धन करताना अनेक आर्थिक अडचणी येतात पण दादा त्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कुठल्याही चुकीच्या मार्गाचा वापर करत नाही आणि हेच त्याच्या यशाच रहस्य आहे.  आज दुर्गवीर परिवाराची धुरा सर्व दुर्गवीर शिलेदारांवर आहे परंतु या सर्व शिलेदारांना एकत्र ठेवण्याच कठीण कार्य संतोष दादा करतोय. मी तर आयुष्याच्या शेवटपर्यंत हे शिवकार्य करणार आहे. आणि तुम्हीहि हे शिवकार्य करून बघाच!!  कुठल्या तरी फालतू गोष्टींसाठी वेळ वाया घालविण्यापेक्षा खूप जास्त आनंद मिळेल या शिवकार्यात
हे झाल दुर्गवीर च्या संतोष दादा बद्दल आता दुर्गवीरमुळेच मी ज्या सरांच्या संपर्कात आलो ते श्री. धन्वी सर त्यांच्याबद्दल……. यांच्या बद्दल सांगायचं तर राहणीमान नीटनेटके एखद्या शिक्षकाला शोभेल असे.  विचार स्पष्ट आणि भविष्य नजरेसमोर ठेवून विचार करणारे व्यक्तिमत्व.  यांचा ध्यास शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा.  खांब गावाजवळ असलेल्या एका आदिवासी पाड्यातील ५० - १०० मुलांना ज्ञानदानाचे कार्य हे सर करतात. फळाची अपेक्षा नाही आणि खूप मोठे कार्य गेल्याचा गर्व नाही. त्यांच्या बोलण्यात एक स्पष्ट जाणवत ते म्हणजे तेथील आदिवासी पाड्यातील मुलांनी किमान शिक्षण मिळायला हव जे त्यांना त्याच्या आयुष्यात उपयोगी पडेल.  आज त्या विभागात या संस्थेच्या दोन शाळा आहेत सरकारच अनुदान नाही त्यामुळे शाळा चालवायची कशी हा प्रश्न येतो तर काही माजी विद्यार्थ्याकडून येणारी देणगी तसेच प्रत्येक शिक्षक स्वताच्या पगारातून वर्षाला रु.१०००/- प्रमाणे देणगी काढतात.  इतर काही सामाजिक संस्था काही मदत करतात त्यावर हि शाळा चालते.  खरच त्यांची धडपड पाहून मन हेलावत.   त्या आदिवासी मुलांना "ज्ञानदान" करण्यासाठी किती ती धडपड.  त्यांच्या याच कार्याला मदत म्हणून आम्ही दुर्गवीर आणि सेवा सहयोग च्या माध्यमातून तिथे स्कूल कीट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांच्या कार्याबद्दल आम्हाला अजून जास्त माहिती मिळाली. आम्ही नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळा च्या दुस-या शाळेला भेट दिली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समजली येथे आदिवासी मुले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी किमान ११ - १२ कि. मी. चे अंतर पायी चालत जातात.  सलाम त्या मुलांना शिक्षणासाठी किती पायपीट नाहीतर आपण…….  खूप सुखी जीवन जगतोय आपण सर्वजण.  खरच जसे तिथले शिक्षक तशीच मुले.  अजून एक गोष्ट मला इथल्या शाळेत जाणवली तिथल्या शाळेच्या प्रत्येक वर्गाला एक नाव दिले होते १० वी चा वर्ग "कळसगिरी", ९ वी चा वर्ग "कळसूबाई",  ८वी चा वर्ग सह्याद्री,  अशी अगदी इतिहासाला हाक देणारी नाव बघून अगदी मन भरून आल.  हि कल्पना इथल्या मुंबईतल्या एका तरी शाळेला सुचली का नाही ?  तिथल्या मुलांचे मार्क अगदी ५० टक्यांपासून ८६ टक्यांपर्यंत ते कोणत्याहि क्लासला न जाता.  का घडते असे? कारण आहे त्यांची शिक्षणाबद्दल ची आत्मीयता आणि ओढ. मुलांची शिक्षणाबद्दल ची ओढ लक्षात घेऊनच श्री धन्वी सर हे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत आणि दुर्गवीर परिवार त्यांना सर्वोतपरी नक्की मदत करेल.  दुर्गवीर परिवारा तर्फे एक संगणक संच या शाळेस देण्याचा मानस आहे.  थोड्या आर्थिक बाबींची जुळवा जुळव झाली तर तर हे प्रत्यक्षात उतरू शकतो. माझा हा लेख वाचून जर तुम्हाला काही या शाळेसाठी, मुलांसाठी काही करावेसे वाटत असेल तर नक्की करा. कोणत्याही दानशूर व्यक्तीला काही मदत करावयाची असल्यास नक्की संपर्क करा. तुम्हाला या शाळेला , या मुलांना भेट द्यायची असल्यास वैयक्तिक किंवा दुर्गवीर च्या एखाद्या मोहिमेत सहभागी होऊन त्या ठिकाणास नक्की भेट द्या आणि श्री धन्वी सर या मुलांना करत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्यात त्यांची नक्की मदत करा.  
शेवटी मला सांगावस वाटत दोन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे हे दोन तारे एक संतोष हसुरकर जे गड किल्ले वाचविण्यासाठी गडसंवर्धन / श्रमदानाचे कार्य करतात आणि दुसरीकडे श्री धन्वी सर जे गरजू, गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य करतात.
माझा या दोन्ही व्यक्तींना मानाचा मुजरा……… 
जय शिवराय 

उजेडाचे डोळे ओले

जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात...