एक मोहीम "अवचीत" अशी……………

आज दि. २८/७/२०१३ रोजीची  दुर्गदर्शन मोहीम तशी दुर्गवीर तर्फे अधिकृत मोहीम नव्हती.  अवचीतपणे (अचानकपणे ) मोहीम ठरली ४-५ जाण्यासाठी तयार झाले गाडी तर जाणारच होती मग ठरलं किती वाजता निघायचं आणि कुठे भेटायचं.  शनिवारी संध्याकाळी ठरलं रविवारी सकाळी ५ वाजता सायन ला भेटायचं.  सकाळी मला जरा उशीर झाला पण माझ्यापेक्षा आमच्या स्वप्नील बंधूना उशीर झाल्यामुळे  माझ्या उशीरा जाण्याची फारशी बोंबाबोंब झाली नाही (चक्क मी वेळेत पोचलो उशिरा उठूनसुद्धा ). आम्ही ५:३० पर्यंत निघणार होतो पण आम्ही चक्क ७ वाजता प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या गप्पा रंगल्या आणि मग  आम्ही सर्व डोळे मिटून आत्मचिंतनात गुंग झालो.  प्रवास सुरु झाला तो थेट थांबला मेढा गावात तिथून मुख्य रस्त्यावरून पायी प्रवास करत आम्हाला जायचं होत.  मी, सुरज कोकितकर, राज मेस्त्री, सचिन रेडेकर, दुर्गवीरांगना ओजास्विनी पावशे आम्ही सर्व गडाच्या दिशेने निघालो आम्हा ५ जणांपैकी मी व राज दादा फक्त अवचितगड वर येउन गेलो होतो.  राज दादा फार वेळा आला नव्हता त्यामुळे त्याला वाट आठवत नव्हती.  माझा तर आनंदी आनंद होता कारण दर ४-५ दिवसांनी माझी मेमरी Format होते त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही कुठल्या वाटेने आलो हे मला आठवण्याचा प्रश्नच नव्हता.  शेवटच्या वेळी मी आणि चंद्रु गड जाताना बरोबर चढलो पण येताना जे चुकलो तेथेट रोहा येथे पोचलो होतो त्यामुळे या वेळी आम्ही विचारातच जायचं ठरवल आमच्या सुरज बंधूनी एका दुकानदाराला विचारल "अवचित कुठे?" एकदा ऐकू नसेल गेले म्हणून त्याने अजून दोन वेळा विचारले पण  त्याच्या चेह-यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह होते नंतर समजल त्या दुकानदाराला सुरज बंधूंची भाषा समजत नव्हती…शेवटी रस्त्यावरून जाणा-या एका आईनी सांगितली तेव्हा आम्ही मार्गाला लागलो मग रस्त्यात येणा-या प्रत्येकाला  "अवचितगड कुठे" हा आमचा एकच प्रश्न होता.  शेवटी आम्ही अवचितगड च्या पायथ्याशी असलेल्या भल्यामोठ्या विहिरीपाशी आलो.  तिथून मोठा प्रश्न (त्या विहिरीपेक्षा मोठा) आमच्यासमोर आ वासून  उभा राहिला समोर फक्त झाडं आणि रान याने वेढलेला डोंगर  दिसत होता आणि त्यात अवचित गड शोधायचा होता.  सुरज बंधूनी संतोष दादांना फोन करून कस जायचं याबद्दल विचारलं दादाचा एकच कानमंत्र "वरती जातांना उजव्या बाजूला वळा".  मग मोहिमेत सुरज कोकितकर बंधूआघाडीवर राहून पुढे चालू लागले  मी आणि राज दादा मागे होतो आणि मागूनच सुरज बंधूना सल्ले देत होतो (तसं सल्ले देण सोप्प असत आज काल जो तो उठतो तो सल्लेच देत असतो) असो असे फुकटचे सल्ले आम्ही सुरज बंधूना देत होतो सुरज उजवीकडे, सुरज इकडे, सुरज तिकडे असे आणि अनेक सल्ले देत आम्ही रमत गमत एका  ठिकाणी थांबत थोडसं खाउन पुढे जाऊ लागलो.  गडावर पोहोचेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी दगडावर काढलेले बाण दिसत होते तिथे आमचे सुरज बंधू "बाण बाण" करून ओरडायचे जणू काय त्यांनी "धनुष्यातला बाण" शोधून काढलाय शेवट पर्यंत सुरज बंधूना विचारायचं राहून बाण नेमका कुठला होता "रामायणांला कि महाभारतातला" शेवटी अगदी माथ्यावर पोचतोच तोच एक आजोबा भेटले त्यांच्याकडून खात्री करून घेतली गड इकडेच आहे ना…. शेवटी आम्ही पोचलो मुख्य दरवाजापाशी तेही न चुकता नाहीतर चुकण्याचा सर्वात जास्त अनुभव मलाच होता पण सुरज बंधूनी शेवटपर्यंत आघाडीवर राहून अवचितगड चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली. आता गडावरील वास्तूंची माहिती मला व राज दादा ला माहित होती.  आम्हा दोघांवर गडावरील वास्तूंची माहिती सांगायची जबाबदारी आली.  त्यात मी नेहमीच "खूप जास्त"  बोलतो (बोलतो कसला बडबडतो) म्हणून मी विचार केला आज राज दादांना चान्स देऊया बोलायचा. राज दादा माहिती सांगत जात होते आणि अधून मधून मला विचारायचे "हो ना धीरु" मी राज दादांना "हो" बोलून अनुमोदन द्यायचो.  राज सदर, शिवमंदिर, पाण्याची टाकी, तोफ अश्या वास्तू पाहत आम्ही गड दर्शन करू लागलो मग एके ठिकाणी बसून थोड जेवण(थोडच हा!! ) करायचा विचार केला.  राज दादाने आणलेले फरसाण आणि ओजास्विनी ताईनी आणलेले धपाटे आम्ही खाल्ले. आजवर संगणक शिक्षक असताना खूप विद्यार्थ्यांना "धपाटे" दिले पण हे असे "धपाटे" प्रथमच खाल्ले.शेवटी उरलेलं फरसाण आणि गोड लोणच अशी Instant Dish (शीघ्र थाळी ) ओजास्विनी ताईनी बनविली अगोदर आम्ही नाक मुरडली पण नंतर मस्त मस्त करून बोट चाटून, डबा चाटून Instant Dish (शीघ्र थाळी ) चा पदार्थ Instantली संपवला.  शेवटी आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आता परतीचा प्रवास करतान चुकलो तर थेट रोहा स्टेशन ला बाहेर येणार होतो.  पण यावेळी सचिन बंधूनी आघाडीवर जायचं ठरवलं मस्त मराठमोळी गाणी लावून सचिन बंधू पुढे चालू लागले. अगोदर ठरल्याप्रमाणे आम्ही डाव्या बाजूने जाऊ लागलो आणि चक्क न चुकता आम्ही गड उतरलो सुद्धा…उतरताना मात्र आम्हाला फार कमी वेळ लागला.  आघाडीवर भीमरूपी सचिन बंधू होते म्हटल्यावर उड्या  मारतच आम्ही सर्व उतरत होतो.  अखेर गड यशस्वीरीत्या उतरलो. खाली आल्यावर जेवणाचा पत्ता नव्हता मग आम्ही थोड फरसाण, बिक्सिट खाउन भूक भागविली.  नंतर आमची परतीची तयारी सुरु झाली.  गाडी निघाली मुंबईच्या दिशेने थोड्या गप्पा आणि खूपस आत्मचिंतन करत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
आज ख-या दृष्टीने "अवचित"पणे ठरलेली मोहीम अगदी यशस्वीरित्या पार पडली……
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….