Thursday, 30 January 2014

गड आला…… पण


गड आला……
पण धाय मोकलून रडला…
उमेदीच्या काळात जो रक्ताने न्हाला
आज तो अश्रूंच्या डोहात बुडाला

गड आला …….
पण धाय मोकलून रडला……
जो होता साक्षी तोफा अन तलवारीला
आज तो भ्यायलाय बाजारबुणग्यांच्या शर्यतीला

गड आला …….
पण धाय मोकलून रडला……
अभेद्य अन अफाट जो परिचित जगताला
आज कोण हात देईल ह्या बुडत्याला

गड आला …….
पण धाय मोकलून रडला……

Wednesday, 29 January 2014

एक आठवण जुनी……सहजच जुन लिखाण चाळताना दुर्गवीर सोबतच्या एका मोहिमेचे लिखाण सापडलं ते आज तुमच्या समोर मांडतो.
दुर्गवीर सोबत मी खूप गडदर्शन, श्रमदान मोहिम केल्या पण प्रत्येक मोहिमेचा एक वेगळा अनुभव असतो, त्यातील एक अनुभव म्हणजे दि. ७ ऑक्टोबर २०१२ च्या "सुरगड श्रमदान" मोहिमेचा अनुभव. तस पाहता गणेश उत्सवातल्या दीर्घ विश्रांती नंतर ती माझी पहिलीच श्रमदान मोहीम होती त्यामुळे माझा उत्साह तर "उसेन बोल्ट" पेक्षा वेगाने वाहत होता. ("उसेन बोल्ट" नाही माहित जाऊदे तुम्ही "पी. टी. उषा" अस समजा.) तर माझा उत्साह "पी. टी. उषा" पेक्षा वेगाने वाहत होता. कधी एकदा गडावर जातोय आणि काम करतोय अस झालेलं. त्या "शनिवारी" मला चक्क "सुट्टी" असल्यामुळे आम्ही शनिवारी सकाळी निघणार होतो. जाणारे आम्ही "इन मीन साडे तीन" होतो. त्यात १ मी, २ संतोष दादा, ३ सचिन रेडेकर आणि उरलेला आमचा महेश दादा. बाकीचे दुर्गवीर काम - धाम निपटाके रात्रीच्या ८ च्या गाडीने येणार होते. अगोदर क्वालीस ने जायचं ठरलेलं मग ते Cancel करीत सकाळच्या दिवा Passenger ने जायचं ठरलं. त्यानुसार पनवेल ला मी आणि संतोष दादा पोचलो. पण आमचे सचिन बंधू व महेश बंधू यांचा पत्ताच नव्हता. त्यामुळे ट्रेन चुकणार हे नक्की होत, त्यामुळे ट्रेन च तिकीट न काढण्याचा "मध्यमवर्गीय" विचार आम्ही केला. शिवकृपेने कदाचित ती ट्रेन लेट झाली आणि अखेर सचिन बंधू आले आम्ही धावत पळत ट्रेन पकडली (तेही विदाउट तिकीट बर का!) मजल दर मजल करत प्रवास सुरु झाला. चायनीज भेळ, बिस्कीट वगैरे खात प्रवास सुरु होता. एकमेकांच्या गावच्या आठवणी, घरची परिस्थिती अश्या अनेक विषयांना हात घालून संतोष दादाने मला बोलत केल. एका क्षणाला मलाही भरून आल कारण मला माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल फारस कोणी विचारलं नव्हत. आणि दुर्गवीर कुटुंबाचे चे हेच रहस्य आहे. इथे प्रत्येक जण प्रत्येकाचा एक "संस्था सभासद" म्हणून नाही तर एक "कुटुंब सदस्य" म्हणून विचार करतो. पुढे असंच एकमेकांची सुख-दुख वाटून घेत प्रवास सुरु होता. तोवर ट्रेन "कसू" स्टेशन पर्यंत पोचली होती, पुढच स्टेशन नागोठणे होत इथे ट्रेन भरपूर वेळ थांबली होती त्यामुळे अगदीच "विदाउट तिकीट" नको म्हणून आम्ही तिघांचे मिळून तब्बल रोख रु.६/-(सहा) खर्च करून तिकीट काढले. पुढे नागोठणेला पोचल्यावर भाजी,चपाती, घेऊन खांब पर्यंत पोचण्यासाठी वाहन पाहू लागलो.एका प्रायव्हेट क्वालीस मध्ये स्वताला कोंबून आम्ही खांबचा तो "अथक" प्रवास पूर्ण केला. आता पोचायचं होत गडाच्या पायथ्याशी असणा-या घरापर्यंत तेही चालत.


या प्रवासात एक विनोदी प्रसंग घडला. मी, संतोष दादा पुढे चाललो होतो सचिन दादा आमच्या मागून येत होते. आमच्या समोर एक कुत्रा येत होता त्याला पाहून दादा बोलला "हे बघ तू जर आम्हाला चावणार असशील तर लक्षात घे तू "एकटा" आहेस आणि आम्ही "तीघे", "तू त्या वाटेने जा आम्ही सरळ जातो" दादाचं हे बोलण तो "लक्षपूर्वक" ऐकत होता. थोडा विचार करून तो रस्त्याच्या कडेला जाउन उभा राहिला आम्ही जोवर जात नाही तोवर……. आम्ही जसे पुढे गेलो त्याने "धूम मचाले" केल…. कदाचित त्याने हे ओळखल असावं कि 'संतोष दादा त्याला "बोलून, बोलून" मारेल', 'मी त्याला "काहीही न बोलून" मारेन', आणि 'सचिन बंधू त्याला "धरून, धरून" मारेल'……… (बिचारा……)


पुढे पार्टे यांच्या घरी पोचलो तिथे पोचून मागून येणा-या "लेट - लतीफ" महेश बंधूंची वाट पाहू लागलो. तोपर्यंत आम्ही माळ्यावरून सामान खाली काढून ठेवलं. उत्साह "पी. टी. उषा" च्या वेगाने वाहत होता त्यामुळे आम्ही पाईप, चेन पुली, २-३ बादल्या, २-३ घमेली, फावडा अश्या भरपूर वस्तू घेतल्या, जणू काय एका रात्रीत आम्ही गडच काय पूर्ण डोंगरच साफ करणार होतो. "इन मीन साडे तीन" मानस काय काय नेणार मग थोड समान कमी केल. आणि सचिन बंधूंकडे चेन पुली दिली, मी bag आणि पाईप घेतला. आज रात्री गडावर वस्तीला राहायचं या उद्देशाने आम्ही निघालो होतो. पायथ्याशी असलेली विहिरीजवळ आमच्या शिदोरीवर ताव मारला आणि गड चढाई ला सुरुवात केली. एरवी मोठ्या हॉटेल मध्येही खाताना मजा येणार नाही इतकी मजा हे अस वाटून खाण्यात येत होती. अर्ध्या रस्त्यापर्यंत सचिन बंधूनी "चेन पुली" च ओझ सांभाळल मग त्यांना थोडा आराम म्हणून पुढे मी माझ्या कांद्यावर "चेन पुली" च ओझ घेतल तेव्हा समजलं सचिन बंधू गड चढताना धापा का टाकत होते!!!. अगोदर त्याचं वजन त्यात "चेन पुली" च वजन. पुढे सुरगडच्या सर्वात कठीण दगडी घळीतून(Rock Patch) आम्ही एकदाचे महादरवाजापाशी पोचलो. शिवरायांचा जयघोष करत आम्ही पुढे गेलो.


गडावर पोचल्यावर टाक्यांची पाहणी केली. ८ ते १० फुट खोल टाक त्यात ४-५ फुट तर चिखल असावा त्यात मी साडे पाच फुटाच माणूस तो काय पोहणार (तसं मला पाउलभर पाण्यातही पोहता येत नाही) मग सचिन बंधू उतरले. पाण्यात टाकीच्या आतून त्यांनी पाईप टाकून दिला तो बाहेरच्या बाजूने खेचून पाणी बाहेर काढायचे होते. ते पाणी रात्रभर त्या पाईपच्या साहाय्याने टाक्याबाहेर जाणार होते.


आता आम्ही गडावर राहण्याच पक्क केल होत. त्यानुसार धान्यकोठार सदृश्य वास्तूत छप्पर बांधून राहायचं ठरल. मी आणि संतोष दादाने गवताच्या सहाय्याने बेड बनवला "फक्त छप्पर" तेवढ बाकी होत. मग आमचे "वास्तूविशारद",बिल्डर, महेश बंधू नवनवीन "आयडियाची कल्पना" देत होते आणि आम्ही ते करत होतो. २-४ सुक्या फांद्या तोडून एका बाजूच छप्पर (कसतरी एकदाच)बांधल आणि जोरदार पाऊस आणि वारा सुरु झाला पण आम्ही दुस-या बाजूने छप्पर बांधू लागलो पण तेही कस कस बांधल पण त्याची अवस्था पाहून आम्हांलाच हसू येत होत.कारण आमच ते छप्पर "छप्पर" कमी "चाळण" जास्त वाटत होती. मग मात्र आम्ही आपले "वास्तूविशारद",बिल्डर, महेश बंधूवर "टीकेचा भडीमार" केला. मी आणि सचिन बंधूनी ठरवलं रात्रभर खडकावर भिजत बसायचं. पण "ते" शक्य नव्हत हे संतोष दादाने जाणलं होत. म्हणून दगडी घळ (Rock Patch) येथील गुहेत बसायचं अस ठरलं. तोवर काळोख झाला होता आणि आमचं "टुमदार घर" केव्हाच धडाम-धूम झालं होत. आता गडावर फिरणं धोकादायक होत, तसा नाही म्हणायला आमच्याकडे एक Torch होता पण त्याचा उजेड एवढ होता कि, चुकून दुस-या डोंगराच्या दिशेने मारला तर पक्षी "सकाळ" झाली म्हणून "किलबिलाट" करतील. त्यामुळे "वरुण राजा" जो "वरून" मारत होता त्याच Torch च्या बळावर आम्ही निघालो. जो Rock Patch चढ-उतरायला इतर लोक सकाळच्या उजेडात घाबरतात तो Patch आम्ही एवढ्या अंधारात सहज पार करत होतो.त्यावेळी कुठली शक्ती आमच्या अंगात संचारली होती कुणास ठावूक? मध्येच एखाद्याचा पाय घसरला तर दुसरा त्याला हात देत होता अस करीत आम्ही त्या गुहेजवळ पोचलो. गुहेत आमच्या अगोदर कोणी गेल नाहीय ना हे पाहण्यासाठी मी गुहेच्या आत गेलो (मनातल्या मनात "मे आय कम इन" सुद्धा म्हंटल) पण आत कोणीच नव्हत एक "वटवाघूळ" व एक "पाल"("पाल" कसली "पाला"च होता तो) मी आत जाताच "पालीने" "काढता पाय" घेतला व "वटवाघूळ" हि फारस "वट वट" न करता निघून गेल. मग त्या दोन-अडीच फुटाच्या गुहेत आम्ही साडे पाच - सहा फुट वाले "फोल्डिंग" पोझिशन मध्ये बसलो. तिथेच एका मरून पडलेल्या खेकड्यावर P.J. करत आम्ही थोडस खाऊन घेतल. दादा ने पुन्हा एकदा अजून पुढे जायचा निर्णय घेतला. जरा पुढे गेल्यावर उतरताना डाव्या बाजूला एक डोंगर कपारी आहे तिथे पोचायचं. तेव्हा मला मात्र "घर ना घाट का" याचा खरा अर्थ कळला होता. (घर म्हणजे ते वरती पडल ते आणि घाट म्हणजे ती गुहा) पुढे सरपटतच आम्ही त्या कपारी पर्यंत पोचलो वाटेत एक ठिकाणी माझा पाय घसरून मी चांगला १-२ फुट खाली घसरलो पण संतोष दादाने टी-शर्ट पकडल आणि पायाखाली एक दगड मिळाला. (तेव्हा एक नवीन म्हण समजली "घसरणा-याला दगडाचा आधार")


पुढे त्या कपारीत पोचलो जिथे आम्हाला रात्र काढायची होती. झोपायची तयारी झाली पण त्या अगोदर खाली एक विलोभनीय दृश्य दिसत होत एका बाजूला गावातील लाईट चा प्रकाश आणि दुस-या बाजूला काळा-कुट्ट अंधार.खाली पोचलेल्या दुर्गवीरांना आम्ही वरती पावसात कसे राहणार याच टेन्शन होत पण आम्ही ४ जण गडावर त्या शिवमय वातावरणात रात्र घालविण्याचा अविस्मरणीय अनुभव घेत होतो. मला तर मी "मावळा" आहे आणि गडाच्या एका बाजूला पहारेकरी म्हणून उभा आहे अस वाटत होत. डोळे भरून तो अनुभव घेतल्यानंतर मी मध्येच कधीतरी झोपी गेलो मध्येच जाग यायची तेव्हा सचिन बंधू प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले दिसायचे कदाचित ते रात्रभर झोपलेच नसावे, मी तर पुरेपूर झोप घेतली . बाहेर धो धो पाऊस पडत होता पण कपारीत अजीबात पाणी येत नव्हते त्या कपारीची रचनाच तशी होती. कदाचित त्या काळात मावळे तिथेच बसून पहारा देत असावेत.


पहाट झाली ती पायथ्याशि असलेल्या दुर्गवीरांच्या Call ने आम्ही आमची इतर कार्य आटपून टाक्यांजवळ गेलो. पाईप लावल्याने बराचस पाणी बाहेर निघून गेल होत. साधारण १-२ फुट पाणी असेल. मी आता बिनधास्तपणे पाण्यात उतरणार होतो कारण मी बुडणार नाही याची खात्री होती. पुढे पाण्यात एक पाणसाप दिसला तो काही करणार नाही अशी "आशा" होती पण "खात्री" नव्हती म्हणून आम्ही जपूनच उतरलो. थोड्याच वेळात मुंबई - पुणे चे दुर्गवीर पोचले आणि तब्बल ४० जणांचा समूह नेटाने काम करू लागला सोबत "हर हर महादेव", "जय भवानी, जय शिवराय" चा जयघोष चालू होता. कुणी चेन पुली वर काम करत होते. तर कुणी दगड/गाळ काढत होते. काही वीरांगना आम्हा मावळ्यांना ब्रेड-जाम, बिस्कीट, पाणी पुरवून आमच्या कामात आम्हाला मोलाच सहकार्य करीत होत्या. इथे जमलेला प्रत्येकजण एकच नाव मुखात/ मनात ठेवून वावरत होता ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज". खर तर या मोहिमेत बरेचसे जुने दुर्गवीर नव्हते. नितीन पाटोळे, संदीप काप, अनिकेत तमुचे, अमित जगताप, प्रज्वल पाटील,देवेश सावंत, प्रशांत अधटराव,गितु ताई, या आणि अनेक जुन्या दुर्गवीरां ची उणीव जाणवत होती. पण आलेला प्रत्येक दुर्गवीर जोमाने काम करीत होता. कुणी थकत होता,थांबत होता आणि पुन्हा जोमाने कामाला लागत होता. अधून मधून वरुण राजा सुद्धा आमच्या पाठिवर शाबासकीची थाप (सर…) मारत होता. टाक जवळपास ८०% साफ झाल होता. सुरुवातीला दिसलेला पाणसाप पुन्हा आम्हाला दिसला पण "पुणे"हून आलेल्या एका "सर्पमित्र दुर्गवीरांनी " त्याला इज्जत मध्ये बाहेर सोडून दिल. संतोष दादा सुरुवातीपासून सर्वांना सूचना देत होता पण आम्ही त्याला टाक्यात उतरू देत नव्हतो कारण त्याची तब्येत ठीक नव्हती पण तरीही "गडावर आलो आणि श्रम नाही" अस म्हणत तो उतरलाच खाली एकदा. एव्हाना टाक जवळपास पूर्ण झाल होत पण बरेचसे मावळे थकले सुद्धा होते तब्बल ७:३० पासून १:०० पर्यंत अविरत काम केल्यावर थकणारच ना!!! संतोष दादांनी एका आजारी असणा-या दुर्गवीरा सोबत काही दुर्गवीरांना गडाच्या पायथ्याशी दुस-या वाटेने पाठवील.


संपूर्ण टाक साफ झालय अस वाटल्यावर आम्ही उरलेले मावळेसुद्धा परतीच्या प्रवासाला निघालो. पण आमच्या अमित शिंदे च मन काही भरत नव्हत त्यांना अजुन थोडा वेळ मिळाला असता तर त्यांनी Polish Paper ने टाक घासून-पुसून साफ केल असत. सगळी साफ सफाई, जेवण, ओळख, अनुभव कथन असे नित्याचे कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रत्येकजण जय शिवराय चे उच्चारण करत एकमेकांचा निरोप घेत होता. शेवटी नेहमीची ट्रेन चुकल्याने टेम्पो, ट्रेन असा प्रवास करत मुंबईत पोचलो.………
इथे आल्यावर एक विचार मनात आला…………कशाला आलो परत तिकडेच राहिलो असतो तर……….
#दुर्गवीर चा #धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Friday, 17 January 2014

विश्वास..


त्यांच्याशी कधीच खोट बोलू नका
ज्यांनी तुमचा खोटेपणा
कधीतरी पाठीशी घातलाय

Tuesday, 14 January 2014

पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन

पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन……


आज ब-याच कालावाधीनंतर पुन्हा पद्मदुर्ग चे दर्शन होणार म्हणून उत्सुकता होती. नेहमीप्रमाणे सुरुवात झाली दादर स्वामी नारायण मंदिरापासून तिथे सर्व एकत्र जमलेले मी थोडा लेटच पोहोचलो होतो (हिरो ची इंट्री उशिरा होते अस ऐकल होत कुठेतरी). भेटल्यावर जय शिवराय, जय शिवराय जयघोषात आम्ही सर्व दुर्गवीर बंधू एकमेकांची भेट घेऊ लागलो. नंतर काही वेळातच आमचा बसचा प्रवास(खरच "बस आत्ता" असा म्हणायला लावणारा प्रवास) या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त दुर्गप्रेमींनी या पद्मदुर्ग मोहिमेस हजेरी लावल्याने मला हवी असलेली "विंडो सीट" हातातून जाणार हे मी अगोदरच माझ्या "दिव्य दृष्टीने" जाणले होते. मुंबई विभागातून तब्बल ४० च्या आसपास दुर्गप्रेमी या मोहीमेत सहभागी झाल्याने माझी Transfer स्वित्झर्लंड वरून राजस्थान मध्ये होणार हे पक्क होत त्यानुसार जेव्हा मी "बस" मध्ये "घुसलो" ते थेट बसच्या "शेवटच्या सीटवर" "बसलो". (ह्यालाच म्हणतात स्वित्झर्लंड वरून राजस्थानला Transfer) असो मग रात्रभर आमच "गरीब बिचार शरीर" वेगवेगळ्या प्रकारे दुमडून आम्ही प्रवास केला. या माझ्या या "योगा" प्रवासात राज मेस्त्री. प्रशांत वाघरे, अमित शिंदे यांनी मोलाची साथ दिली. गाडीचा ड्रायव्हर जणू नुकताच "नासा" मधून राजीनामा देवून आल्याप्रमाणे बस चालवत(पळवत, हाकत) होता. कदाचित नासाने त्याला "ओव्हर स्पीड" ने यान चालवलं म्हणून "कामावरून काढलं" असावं.


अखेर पहाटे ४-५ च्या सुमारास आम्ही पद्मदुर्ग च्या जवळ असलेल्या गावात पोचलो तिथे पुणेवरून आलेले २० दुर्गवीर आमच्या सोबत आले. नंतर सगळे मिळेल ती जागा पकडून झोपी गेले. आता इथेही मी थोडा लेट झालो आणि झोपायला जागा न उरल्याने मी बेघर माणसाप्रमाणे जागा शोधू लागलो शेवटी एका खोलीत एक "खाट" होती पण तिथेही Bag असल्यामुळे आम्ही सरळ "खाट" च्या "खाली" आमचा बेड तयार करून झोपलो… सकाळी उठून फ्रेश झाल्यावर पोहे आणि चहा वर ताव मारून आम्ही सारे दुर्गवीर ठरल्याप्रमाणे निघालो "पुनच्छ पद्मदुर्ग" दर्शनासाठी…… सुरुवातीला सर्वांची बोट मध्ये बसण्यास धडपड सुरु झाली तब्बल २ मोठ्या व एक छोटी बोट भरून आम्ही जाणार होतो. एक मोठी बोट पुढे निघून गेली दुसरी मोठी बोट सुद्धा भरली. नंतर मी, संतोष दादा, प्रशांत वाघरे, नितीन पाटोळे आणि ४-५ जण छोट्या बोटीत बसणार होतो.


आम्ही सर्व बोट मध्ये आसनस्थ झाल्यावर आमची "बोट" "पाण्याचा प्रवाह कापत" पुढे जाऊ लागली जणू "मावळे" "गनीमांना कापत" पुढे जातात. पुढे "हर हर महादेव"च्या जयघोषात आम्ही पुढे जाऊ लागलो. गडावर पोचल्यावर प्रथम सर्वांची ओळख परेड झाली. संतोष दादांनी मोहीम कशी पार पाडली जाईल याची माहिती दिली. ओळख झाल्यावर सारे नवीन व प्रथम आलेले दुर्गवीर (हो कारण आता सर्व दुर्गप्रेमी "दुर्गवीर" झाले होते) गड दर्शनासाठी गेले आम्ही काही मोजकेजण प्लास्टिक पिशव्या घेऊन गडावर इतरत्र टाकलेला प्लास्टिक कचरा गोळा केला. सारे दुर्गवीर गड --पाहून झाल्यावर आमच्या सोबत सामील झाले. हा हा म्हणता जवळपास ७-८ मोठ्या पिशव्या भरून कचरा गोळा केला.


गड फिरताना एक गोष्ट लक्षात आली कि महादरवाजाच्या समोरील भागात एका मंदिराचे अवशेष होते पण तेथील मूर्ती त्या जागेवर नव्हती आसपासच परिसर न्याहाळल्यावर ती मूर्ती बुरुजाच्या बाहेर समुद्राच्या दिशेने टाकली होती.(ती कोणी फेकली हे वेगळ सांगायला नको) मग आम्ही दुर्गवीर गड संवर्धना सोबत संस्कृती/धर्म रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलो. ती किमान ५०-६० किलोची मूर्ती ४-५ दुर्गवीरांनी उचलून ठेवली(तस सचिन रेडेकर बंधू एकटेच "काफी" होते). ती देवीची मूर्ती इच्छित जागेवर ठेल्यावर मनाला एक शांती मिळाली. ती मूर्ती जागेवर स्थानापन्न झाल्यावर आनंद मिळाला ख-या देवपूजेचा….या मोहिमेत एक बाब प्रकर्षाने जाणविली ती म्हणजे या मोहिमेत तब्बल १२-१३ महिलांचा सहभाग होता यात छोट्या छोट्या ताई पासून मोठ्या आईंचाही सहभाग होता.

अखेर मोहिमेचा उत्तरार्ध सुरु झाला. शेवटी महराजांची आरती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. नंतरचा डाळ, भात, लोणच, पापड, भाजी, चपाती यावर अक्षरशा तुटून पडत आम्ही जेवलो.

पुन्हा आम्ही सर्व एकत्र जमलो. सर्व नवीन दुर्गवीरांनी आपले या मोहिमेबद्दल व दुर्गवीर च्या कार्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येकजण दुर्गवीर च्या कार्याचे परिणामी आम्हा सर्व "दुर्गवीर शिलेदारांचे" कौतुक करीत होता ते ऐकून कान सुखावत होते पण आपल्यावरील लोकांच्या विश्वासाची आणि विश्वासातून आलेल्या जबाबदारीची जाणीव आम्हाला होत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने दुर्गवीरच्या कार्यात सहभागी होण्याचे वचन देत होता. माझ त्या सर्वांना एक आवाहन आहे कि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यातून तुम्हाला हे शिवकार्य पुढे कसे नेता येईन याचा प्रयत्न करावा. या दुर्गवीरां मध्ये काही शिक्षक होते त्यांनी त्यांच्या शाळामध्ये य कार्याचा प्रसार करावा व मुलांना या दुर्गदर्शन, श्रमदान मोहिमेत सहभागी करून घ्यावे, शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. काही Animation, Editing या क्षेत्रातील होते त्या दृष्टीने काही माहितीपट (Video Clip) असे आणि इतर प्रकारे आपला सहभाग या शिवकार्यात ठेवावा.

या संपूर्ण मोहिमेत मी खूप काही अनुभवले. दुर्गवीर बद्दल इतर किती चांगला विचार करतात आणि आम्हा दुर्गवीरांकडून कोणत्या कार्याची अपेक्षा ठेवतात याचा पुर्नप्रत्यय आला….

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Tuesday, 7 January 2014

शायरी


कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता है
ये कहता है जमाना सदियों से
तुम पा लो वो सारी खुशिया
जो मिल सके इस नाचीज को गवांने से

दुर्गवीर चा धिरु
http://dhiruloke.blogspot.in/

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...