Thursday, 25 April 2013

हिंदू ........
मान हिंदू , अभिमान हिंदू ।। 
या देशाची शान हिंदू, ।।
भगव्याचा पाईक हिंदू ।।
या भगव्यास फडकवे हिंदू ।। 
या म्लेच्छाचा काळ हिंदू  ।।
स्वराज्याचा तारणहार हिंदू ।। 
या तलवारीची पात हिंदू  ।। 
गनिमावर वज्रघात हिंदू  ।। 
आगीची ललकार हिंदू  ।। 
वा-याची रफ्तार हिंदू  ।। 
सागराहून उत्स्फूर्त हिंदू  ।। 
आभाळाहुनी अफाट हिंदू ।। 
  

Wednesday, 24 April 2013

एक तरुण चाळीशीतला (मा. सचिन रमेश तेंडूलकर )
एक तरुण चाळीशीतला (मा. सचिन रमेश तेंडूलकर ) 

तो आला…. उंची होती साधारण ५ फुट(कदाचित त्यापेक्षा कमी ) वय अवघ १६ ते १७ अगदीच शिडशिडीत बांध्याचा, कुरळ्या केसाचा एक छोटासा मुलगा आला अगदी आत्मविश्वासाने, डोक शांत ठेवून खेळला. आणि हा हा म्हणता सर्व जगाला आपलस करू लागला.  जसजसे वर्ष उलटत गेली तस तसा तो विक्रम रचवू लागला. आणि आज तेवीस वर्षानंतर तो चाळीशीत पोचला तोवर अनेक फलंदाजांचा तो आदर्श आणि गोलंदाजांचा काळ बनलाय… 
अश्या ह्या महान फलंदाजाला क्रिकेटच्या देवाला माझा मानाचा मुजरा… 
आणि वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा। 

Monday, 15 April 2013

सुसाट… भन्नाट… वेगात…सुसाट… भन्नाट… वेगात… 

गेल्या वर्षभरात मी दुर्गवीरांना आणि वीरांगणांना श्रमदान करताना पाहत आलो सगळे अगदी जोमाने श्रमदान करायचे मग ते काम पायवाटेचे असो वा पाण्याच्या टाक्यांच दुर्गवीर आणि वीरांगणा नेहमी सेवेच्या ठायी तत्पर… पण आज प्रथम बाईक वर सुसाट…  भन्नाट…  आणि वेगात…   असलेले दुर्गवीर आणि वीरांगणा पहिले.  औचित्य होत "गुढीपाडवा / नववर्ष निमित्त मुंबई ते उंबरखिंड स्वागत फेरी"… 
तसे नेहमी ट्रेन किंवा महेश दादाची गाडी (विमान) घेऊन जाण श्रमदान करण आणि श्रमदान करून परत येण  हा आमचा नेहमिच्या मोहिमांचा उपक्रम पण आजची मोहीम काही वेगळीच होती. आम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल ला एकत्र येणार होतो. मी, अजित दादा, प्रशांत दादा, ओजास्विनी ताई, संतोष दादा ठाणे ला भेटून पनवेल ला पोचलो तिथे अगोदर काही जण पोचले होते. नेहमीप्रमाणे आमच्या महेश दादाच विमान उशिराने सुटल त्यामुळे आम्ही सर्वजन पनवेल ला त्याच विमान यायची वाट पाहत होतो. सगळे जमा झाले.  नंतर नारळ फोडून मोहिमेला सुरुवात झाली. सर्वांनी आपापल्या बाईक ला भगवे झेंडे बांधले (ज्यांच्याकडे आपली बाइक नव्हती त्यांनी  ते झेंडे  बांधायला मदत केली अजून काय करणार) मग मध्येच कुणीतरी फेट्याचा विषय काढला आणि मी माझ्या ब्यागेतून फेट्याचा कपडा काढला अनिकेत दादा ने छानसा फेटा बांधला वरती मस्त पैकी "तुरा" पण काढला.   मी एकटाच "फेटा मिरवत" "तो-यात"(तू-यात) निघालो पण तो "तोरा" फार काळ टिकला नाही कारण फेट्याचा "तुरा" झोपी गेला.(कपडा जरा जुना होता म्हणून हा!! नाहीतर अनिकेत दादा ला वाईट वाटायचं). मी गपचूप ते कपडा गळ्यात ठेवला आणि शांत बसलो.  नंतर लगबग सुरु झाली कोण कोण्याच्या बाईक वर बसणार मी अगोदरच देवेंद्र पारकर याच्या बाईक वर जागा फटकावलि. राज दादा चा खरा तर हक्क होता त्यावर तो मी हिरावून घेतला आता राज दादा विस्थापिता सारखा इकडे तिकडे बाईक शोधू लागला नंतर त्याला पण मिळाली एक जागा तोही खुश!!! मग सुरु झाला आम्हा दुर्गवीरांचा / वीरांगनांचा सूसाट…. भन्नाट…. वेगात… असा प्रवास
सर्व निघालो कधी आम्ही मागे तर कधी पुढे… रस्त्याने भगवे झेंडे लावलेल्या बाईक ची लांबच लांब रांग आणि अधून मधून शिवरायांचा जयघोष अगदी शिवमय आणि उत्स्फूर्त वातावरणात आमचा प्रवास चालला होता मध्ये मध्ये थांबत आमचा प्रवास संपला तो उंबरखिंडीच्या पायथ्याशी एका घराजवळ तेथे चहापान झाल. सर्व बाइकस्वारांनी आपले पाय मोकळे केले आणि पुन्हा रान मोकळ मिळाल्यासारखे बाइक पळवत उंबखिंडीत निघाले ज्या खिंडीत कारतलब   खानाला हाल हाल होऊन पराभूत होऊन मागे परतावं लागल त्या खिंडीतून आम्ही भगव्या निशानाची दौड सुरु होती.  जाणवत होत त्या उंबर खिंडीच वैशिष्ट तीनीही बाजूना डोंगर आणि मधोमध ती जागा खानाने तिथे इतक अफाट सैन्य आणि लवाजमा  आणला आणि तोंडघशी पडला. अभिमान वाटू लागला आपल्या राजेंच्या बुद्धिमत्तेचा एवढ्या अफाट सैन्याला मुठभर सैन्याच्या मदतीने धूळ चारली. खरच या प्रसंगातून स्पष्ट होत होता युक्ती आणि शक्ती यांचा मिलाफ…. शिवरायांनी  कारतलब  खानाला अगदी युक्तीपुर्वक या खिंडीत आणल नंतर याच खिंडीत त्याच्या सैन्यावर चाहोबाजुनी आक्रमण केल तेव्हा खानासमोर दोनच पर्याय होते हरायचं किंवा मारायचं पण पळपुट्या खानाने शेवटी हरायचं कबुल केल(हरण्यापेक्षा मरण पत्करायला तो काही "शिवरायांचा मावळा" नव्हता) आणि अश्या एका लढाईत ज्यात राजे स्वत प्रत्यक्षरित्या सामील झाले होते त्यात ऐतिहासिक असा विजय मिळवला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली उंबर खिंड

आम्ही सर्व त्या पावन भूमीत प्रवेश केला आणि नतमस्तक झालो त्या राजेंच्या चरणाशी. गेल्या गेल्या आम्हाला नजरेस आल कि तेथल्या भगव्या ध्वज स्तंभांवरील भगवा ध्वज काहीसा चांगल्या अवस्थेत नव्हता पण चढणार कोण त्या स्तंभावर मग काय "एकच नाव एकाच पर्याय अमित शिंदे अपना भाय " आपल्या टारझन या नावाला साजेसे काम करत अमित बंधू सरसर खांबावर चढले दुसरा एक भगवा त्याठिकाणी लावून सरसर खाली पण उतरले(गेल्या जन्मी नक्कीच मावळे असणार कुठेही चढू शकतात अमित बंधू). समोरच एक स्मारक आहे तिथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांची आरती, जयघोषाने परिसर दुमदुमून टाकत आम्ही पुढे गेलो. नंतर आम्ही सर्वांनी मिळून इतिहास जागवला संतोष  दादा ने सर्वांना बोलण्याचा आग्रह केला (मी बोलन टाळल!! कशाला उगाच सर्वाना घरी जायचं होत उगाच बोलायला लागलो तर थांबत नाही… ) नंतर आपल्या परीने परिसर न्याहाळून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. जेवण करून आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघणार होतो.  ज्यांना लवकर घरी पोचायचं ते महेश दादाच्या गाडीने(विमानाने) गेले.  आणि आम्ही आलो तसे पुन्हा बाईक ने जाणार होतो आता देवेंद्र पारकर बंधूनी रथाची मालकी पालव बंधूंकडे दिली होती (मी चालवलि असती हो!!!  पण कशाला उगाच दुस-याच्या वस्तूला हात लावा!! आणि ती वस्तू "तुटणारच" हे १००% माहित असल्यावर मुद्दाम कशाला रिस्क घ्या )… 
पुन्हा आमचा प्रवास थांबला आमच्या मराठी फेसबुक परिवार चे सर्वेसर्वा प्रज्वल पाटील यांच्या घरी त्यांच्या घरी कोल्डड्रिंक  मग चहा मग बिस्कीट मग पुरणपोळी असा खमंग नाष्टा करून आम्ही पुन्हाला निघालो मग सर्व वेगवेगळ्या दिशेला विखुरले आणि पोचले आपल्या इच्छित स्थळी….
मी गेल्या वर्षभरात पहिल्यांदा सर्व दुर्गवीरांना आणि वीरांगणांना श्रमदानाशिवाय सुसाट… भन्नाट… वेगात… पहिले खरच मन भरून आले… 

"आई"हो आहे ना माझी मैत्रीण!!!!
जी सतत माझी काळजी करते 
कुणावर नाही इतक माझ्यावर प्रेम करते 
माझ्यासाठी नेहमीच ती झुरते 
माझ्या काळजीत सतत ती तडफडते 
माझ्या प्रत्येक क्षणावर बारीक लक्ष ती ठेवते 
सतत मला हव-नको ते बघते 
माझ्या चांगल्याची स्तुती ती करते 
चुकलोच कधी तर प्रेमाने ती फटकारते
दुख माझे तिला न सांगताच कळते 
मला दुखी पाहून तीहि हळहळते
सारे जग तिला "आई" म्हणून ओळखते…

Friday, 12 April 2013

हसताही येत मला......


हसताही येत मला… 
अगदीच नाही अस समजू नका
बघत असलो रागात तरी 
रागीट मला समजू नका 

खळखळून नाही हसलो कधीच 
तरी मिशीत जरासा हसतो मी 
दुस-यांच्या हसण्यातच 
माझा आनंद शोधतोय मी 

धुंदित असतो मी कधी कधी 
पण शिवकार्याच्या धुंदित रमतो मी 
ह्या भगव्याची आन मजसी 
या शिवकार्यासाठीच मातीत मिसळेन मी 

जय शिवराय 
(फोटो साठी खास आभार कु. शैलजा जोगल )

Wednesday, 10 April 2013

"दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"
प्रथम तुम्ही माझ्या पहिल्या लेखाला (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर) उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता दुसरा भाग "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"

शिवजयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला. आता तयारी सुरु झाली मोहीम वढू-तुळापुरची. तस माझ मोहीम वढू-तुळापुर ला जाणं जवळपास रद्द झालेलं कारण रविवारी Audit होत. पण माझ मन मला स्वस्थ बसू देत नव्हत. मला स्वताचाच राग येत होता. किती दिवसांपासून माझी इच्छा होती या २ पवित्र स्थानांना भेट देण्याची. मन सारख खात होत मला. खर तर शिवजयंतीच्या कार्यक्रमात माझ लक्षच लागत नव्हत. मी अक्षरशा रडकुंडीला आलो होतो. अधून मधून राज दादा मला सांगत होता "धीरु तू येतोयस", "मला बाकी काही सांगू नकोस तू येतोयस"… खूप विचार केला शेवटी ठरवलं जायचं मोहीम वढू-तुळापुर ला जायचं बाकी सर्व गेल उडत…आम्ही कसे निघालो तिथे काय अनुभवल हे मी या अगोदरच्या " (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर)" या लेखात मांडलाय मी मुद्दामहून २ लेख लिहिले कारण आम्ही वढू-तुळापुर या दोन ठिकाणी जे अनुभवल ते अप्रतिमच होत. 
आम्ही अजय दादांच्या घरून थेट तुळापुर ला पोचलो आम्हाला कल्पना होती तिथे आम्ही अंगावर शहारे येणारे अनुभव घेणार आहोत. आम्ही गाडीतून उतरलो समोर बघितले भव्य प्रवेशद्वार आतमध्ये काही पर्यटक डब्बा खातायत, काही दुकान मांडली आहेत, कोण झोपलय काय आणि कोण अजून काय करताय? शे… या डोळ्यांना अक्षरश यातना होत होत्या अरे आमच्या धाकल्या धन्यान स्वराज्यासाठी स्वताच्या आयुष्याचे बलिदान दिले तिथे तुम्ही पिकनिक कसली काढताय! तिथल्या प्रत्येकाला पकडून सांगावे असे वाटत होते " अरे मुर्खानो हि पिकनिक ची जागा नाही रे!" इथे शंभू राजेंनी प्राण सोडले, त्याची हि अशी विटम्बना. खरच औरंगजेब जेव्हा डोळ्यात तप्त सळ्या घुसवत होता त्यावेळी शंभू राजेना जितक्या यातना झाल्या नसतील त्यापेक्षा कितीतरी जास्त यातना आज होत असतील, आज त्या समाधीस्थळाची होत असलेली दुरवस्था पाहून…. अरे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही रे! ज्या जागेची धूळ मस्तकी घेऊन यावी तिथे तुम्ही बसून डबे काय खाताय, झोपताय काय? चीड आली ते सर्व पाहून. शेकडो वर्षापुर्वी परकीयांनी आपल्या राजांचा अपमान केला पण आज त्या राजेंचा अपमान करणारे कोणी परके नाही आपलेच आहेत. अहो ज्या भामा, भीमा, इंद्रायणी तीरी ते संगमेश्वराचे मंदिर, समोर शंभू राजेंची भव्य मूर्ती पुढे कावि कलश व शंभू राजेंची समाधी इतक्या पवित्र स्थानी काय रे हे अपवित्र वर्तन. अरे काही मोजक्या पैश्यांसाठी आणि क्षणीक आनंदासाठी बाजार मांडलाय या पवित्र स्थानाचा. 
इथे आलो तेव्हा मनात वेगळेच विचार होते पण इथे जे बघितले ते पाहून मन अस्वस्थ झाल. राजे तुम्ही धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपले प्राण दिलेत पण हे "स्वार्थी लोक" सर्व आत्मीयता विसरून भलतीकडे चाललेत हो…. राजे थांबवा हे सर्व… आम्ही तिथून पुढे गेलो जिथे तीन नद्यांच संगम होतो. भामा, भीमा, इंद्रायणी पण तिथेही तेच, कोण कपडे धुतय, कोण गर्मी होतंय म्हणून आंघोळ करतय आणि काय काय? अक्षरश: रडायला येत होत ती विटम्बना पाहून. अस वाटत होत आपण उगाचच इतर धर्मियांना दोष देतो अहो इथे आपलच "नाण खोट" आहे त्याला काय करणार. तिथे त्या त्रिवेणी संगमाच्या नदीचा इतिहास तुळापुरचा इतिहास लिहिलेला फलक होता तो आम्ही वाचत होतो तेवढ्यात तिथे एक वृद्ध स्त्री आली तिने त्या फलकाच्या समोर हात आणि तोंड धुतले काय म्हणावं याला…अरे हात धुण, आंघोळ करण, कपडे धूण हे सर्व करायची हि ती जागा आहे का? 
हा राजेंच्या पावित्र स्थळाचा होत असलेला अपमान आम्ही सहन करतच तिथून निघालो वढू च्या दिशेने मनात सल कायम होती का होतेय अशी विटम्बना…. आमच्या धाकल्या धन्याची…. अश्या पवित्र स्थळांना पिकनिक स्पॉट म्हणून भेट देन आणि त्या स्थळाचा अपमान / विटम्बना करण कधी थांबणार???? हा एकच सवाल माझ्या मनात होता(कदाचित सर्व दुर्गवीरांच्या मनातहि हाच प्रश्न असावा). 
तिथून निघाल्यावर आम्ही पोचलो वढू ला मनात भीती होती इतेही तोच बाजार मांडला नसेल ना!! पण खरच इथे त्याच्या अगदी विरुद्ध वातावरण होत. अगदी शांतता. समोर शंभू राजेंची समाधी. आम्ही समाधीच दर्शन घेतलं. तिथे माथा टेकताना अंगात अक्षरशा विज चमकून गेली. एक क्षण खरच शंभू राजेंच्या चरणावर माथा टेकतोय अस वाटत. कंठ दाटून आला. पण तसाच आवंढा गिळत मी दर्शन घेतले. बाजूलाच जाउन बसलो सगळे दुर्गवीरांनी शंभूमहाराज, शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. समाधीभोवती आम्ही सर्व दुर्गवीर बसलो. कोणीतरी शंभू राजेंचे "बाळ इथे निजला" हे काव्य लावण्याची विनंती केली. काव्य सुरु झाल "भीमा इंद्रायणी तीरी…." समोर तो भामा भीमा इंद्रायणीचा संगम तरळू लागला. "वढू तुळा संगमावरी… " दोन पवित्र स्थान खाडकन डोळ्यासमोर उभी राहिली. "मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूहि थिजला…" समोर एक बाणेदार, तेजस्वी, रौद्र रूप समशेरीसह उभे राहून मृत्यूला आव्हान देताना दिसले…. ते रूप डोळ्यातून अक्षरशा आग ओकत होते. वाटत होते बस…. राजे बस…. हेच रूप घेऊन या आणि संपवून टाका गनिमांना…. आणि पुढच्याच क्षणी पुढची ओळ कानावर पडली आणि डोळ्यात टपकन पाणी आल ते वाक्य होत "बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला"…. ते संपूर्ण काव्य आम्हा सर्वा दुर्गवीरांना त्या राजेंच्या बलिदानाच्या प्रसंगात घेऊन गेले. वाघा सारखे आलेले आलेले शंभू राजे शिवबांसारखे जगून, सिंहासारखे मरण झेलून एक तेजस्वी राजा म्हणून अमर झालेले शंभू राजे माझ्या डोळ्यासमोर तरळू लागले(कदाचीत सर्वांच्या). कधी कुणाला शरण न जाता प्रसंगी मरण पत्करणारे शंभू राजे शिकण्यासारखे आहेत आजच्या स्वार्थी आणि लाचार लोकांनी.…. खरच निस्वार्थी जगण आणि धर्मासाठी, देशासाठी बलिदान देण म्हणजे काय हे शंभूराजेना जाणल्यावर समजत, पण त्यासाठी शंभू राजेंच तो निस्वार्थीपणा शिकला तर पाहिजे… 
मुजरा राजे मुजरा तुमच्या चिकाटीला, जीद्धीला तुम्ही अवघ जीवन रणांगणात घालवल पण हार म्हणून कधी मानली नाही. आयुष्यात आलेल्या प्रचंड दुखांवर मात करून शिवरायांचे स्वप्न साकार करण्यासाठी जो सागरारूपी पराक्रम केला तो तुमच्या बलिदानाने, करुणेचा / दुखाचा आगर झालाय…. दगडा सारखा अखंड/अभेद्य असा सह्याद्री तुमच्या बलिदानाने अश्रुनी भिजलाय राजे…… असा भावार्थ त्या काव्याच्या प्रत्येक ओळीतून व्यक्त होत होता. या काव्याच्या प्रत्येक ओळीनुसार आम्हा सर्वांचा मन हेलावून जात होत. खर सांगतो किती स्वताला थांबवल तरी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.(प्रत्येकजण ते दाखवत नव्हता एवढच). नील दादांकडे माझ सहज लक्ष गेल, तर एरवी हसतमुख राहणारा नील दादाच्या डोळ्यातून पाणी वाहत होत इतर सर्वांची अवस्था काही वेगळी नव्हती. काही क्षण तिथे स्तब्धता होती कोणी काहीही बोलत नव्हते… कारण प्रत्येकजण शंभू राजेना डोळ्यासमोर पाहत होता. थोडा वेळ तसाच गेला. कुणाच्या तोंडातून एक चकार शब्द येत नव्हता कसा येणार सर्वांचे गळे दाटून आले होते. मी तिथून उठलो आजूबाजूचा परिसर न्याहाळला खरच तिथे कुठेतरी शंभूराजेंचे वास्तव्य असल्याचा भास झाला. तिथे थोडा वेळ गेल्यावर बाहेर आलो तिथेहि थोडा वेळ आम्ही बसलो. सारख वाटत होत या जागेत काहीतरी आहे. नक्कीच शंभूराजेंच वास्तव्य तिथे असावे. आजूबाजूच्या झाडाच्या पानांचे आवाज तिथलि शांतता भंग करत होते. एखाद्या पक्ष्याचा आवाज मनात धडकी भरवत होता. इतकी शांतता!!! 
मनात विचारचक्र चालू होते का अस? वढू आणि तुळापुर दोन्हीही पवित्र स्थान मग एका जागेवर तिथले पावित्र्य "नष्ट करून टाकलेले" आणि दुस-या ठिकाणी "अजूनतरी" "पावित्र्य राखलेले"…. खरच कलियुग म्हणतात ते हेच कदाचित आपण सर्व गोष्टीची फक्त वाट लावतोय. सर्व पवित्र गोष्टींचा बाजार करतोय. कुठल्या धार्मिक स्थळावर जा तिथे बाजार! कुठल्या ऐतिहासिक स्थळावर जा तिथे बाजार! कुठेही जा फक्त आणि फक्त बाजार! मन हेलावत हो, हा बाजार पाहून…. किती सोसायच त्यांनी… शंभू राजेंच्या समाधीच्या त्या वढू आणि तुळापुर यापैकी सरस स्थळ कोणतं हे सांगायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. दोन्ही स्थळ आमच्यासाठी सारखीच पण त्याच पावित्र्य नष्ट केलय ते आपल्यातील काही लोकांनी, तेही स्वताच्या स्वार्थासाठी...
कधी थांबणार हि विटम्बना!!!! आहे का कोणाकडे याचे उत्तर 
जय शिवराय 
जय शंभू राजे 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Thursday, 4 April 2013

काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर


काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर
[आमची वढू तुळापुर मोहीम सर्वच अर्थाने जबरदस्त झाली. काही हसरे तर काही मनाला चटका लावून जाणारे तर काही धाकल्या धन्याच्या आठवणीने मन हेलावून टाकणारे… हे सर्व अनुभव एका लेखात लिहीन मला योग्य वाटत नव्हत म्हणून मी याचे २ लेख लिहिले त्यातील पहिला "काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर" आणि दुसरा लेख "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"…. यातील हा पहिला लेख तुमच्यासमोर आणतोय दुसरा लेख पुढील काही दिवसात नक्की येणार तोपर्यंत या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा… ] 

शिवजयंती चा उत्सव उत्साहात पार पडला आणि आम्ही ७ जण वढू-तुळापुर ला जाणार होतो. त्यानुसार मी, राज मेस्त्री, नितीन पाटोळे, नील मयेकर, सचिन रेडेकर, सुरज कोकितकर, मोनीश चौबळ असे ७ निघालो. मी आणि राज दादा त्याच्या घरी जेवून निघालो. दादर स्टेशन ला नितीन,सुरज,नील,सचिन अगोदर पोचले होते. रात्री ११:४५ च्या दरम्यान ट्रेन होती चेन्नई एक्स्प्रेस. ट्रेन मध्ये गर्दी नसणार आपण आरामात झोपून जाणार या विचारात आम्ही होतो. ट्रेन आली नेमका जनरल डब्बा मागे आला पुन्हा आमची धावपळ डब्बा पडायला. शेवटी एकदाचा पकडला डब्बा, आतमध्ये बघितल आमचा सर्वांचा चांगलाच भ्रमनिरास झाला होता. कारण आमच्यापैकी एकालाही बसायला जागा नव्हती. जो कोणी म्हणाला "गाडीत जागा मिळेल बसायला" त्याच्या नावाने खडे फोडत आम्ही जागा मिळेल तिथे पसरलो. सचिन आणि नितीन दादा मागे होते मी, सुरज, नील आणि राज दादा पुढे गेलो पण मला उभ राहायलाही जागा काही मिळाली नाही आता मी मोठ्या धर्म संकटात सापडलो मागे जायचं का पुढे गप्पपणे गरीब चेहरा करून उभा राहिलो. अपेक्षा होती कोणीतरी थोडी तरी जागा देईल आणि मी बसेन. पण कसल काय मी आपला गरीब माणसासारखा उभा राहिलो. समोरचा एक माणूस उठला आणि सीट खाली जाउन झोपला आता तिथे एक जागा झाली होती पण मी ती जागा हिसकावून न घेता माझी गरीबपानाची Acting तशीच चालू ठेवली समोर जागा दिसतेय पण बसू शकत नव्हतो. त्या एवढ्याश्या जागेसाठी त्या बायकांबरोबर भांडेल कोण? म्हणून मी तसाच उभा राहिलो पण दुसरा कोणी आत जाउन ती जागा मिळवणार नाही याची खबरदारी घेतली होती. थोड्या वेळ त्या रिकाम्या जागेकडे पाहत राहिलो माझी ती अवस्था बघून तिथल्या एका माणसाने मला बसायला सांगितलं त्यामुळे माझा धीर जरा वाढला. आणि कोणी आडवल असत सरळ शिरच्छेद च केला असता त्याचा (नजरेने हा!).तसच झाल तिथल्या एका बाईने आक्षेप घेतल्या माझ्या बसन्यावर मी असा काही Angry Young Man चा लुक दिला कि तीही जास्त काही बोललि नाही. आता माझी जागा fix झाली प्रश्न इतर दुर्गवीरांचा होता सगळे माझ्याकडे आच्छर्याने बघत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न असावा "याला जागा मिळालीच कशी" नंतर तिकडे नितीन दादांनी बोलबच्चन देऊन जागा पटकावली आणि शक्तिमान सचिन दादा नि उभ्या असलेल्या जागेत पद्धतशीरपणे बसून घेतले (त्यांना कोण उठवणार हो! उठवनाराच या जगातून उठायचा!!!) इकडे राज दादा, नील दादा, सुरज दादा आळीपाळीने जागा पकडून बसत होते. नंतर काय झाल काय माहित देव माझ्यावर जामच खुश होता. मला थेट Window Seat ची ऑफर आली मी लगेच ती स्वीकारली. आणि मी Window Seat वर स्थानापन्न झालो. नंतर ट्रेन कल्याण ला पोचली तिथे मोनीश दादा तयार होते. मी Window Seat (Window Seat बर का?) वरून मोनीश दादा ला आवाज दिला दादा आत आला आता मी सुरज ला माझ्या Seat वर थोडी जागा दिली. खर तर ती सिंगल Seat होती आणि आम्ही त्यावर दोघे बसलो होतो. त्यात मी सुरज दादा ला सोबत घेतल त्यामुळे जरा अडचण होत होती. तरीही Adjust केल कस कस. बाजूला बसलेला भैया (जो मराठी नाही तो भैयाच ना!) सुरज दादाच्या नावाने खडे फोडत होता पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केल आणि आमच अतिक्रमण सुरूच ठेवल. अधूनमधून मी डोळे बंद करून विचार करू लागलो (नेहमी प्रमाणे सर्वांना वाटत मी झोपलोय). शेवटी आमच्या मराठी माणसाच्या अतिक्रमणाला कंटाळून तो भैया का कोणी व्यक्ती चक्क ती जागा सोडून खाली बसला(बघा आच्छर्याची गोष्ठ आहे ना! मराठी माणसाच्या आक्रमणाला कंटाळून भैया ने जागा सोडली) असो मग सुरज दादा गाणी ऐकत होते, मोनीश, नील आणि राज दादा चर्चा करत होते. नंतर राज दादा पण Ground Floor वरून First Floor वर बसून डोळे बंद करून विचार करायला गेले.(मी करतो तसा). मी पण अधून मधून ध्यानाला बसायचो. रमत गमत ट्रेन एकदाची पोचली पुणे ला खर तर आम्हाला उतरायचा होत दुसरीकडे पण काय करणार ट्रेन ड्रायवर ला कुठे माहित होत आम्ही काही Plan न करता आलो होतो. असो आम्ही साधारण ३:३० पर्यंत पुणे ला पोचलो स्टेशन ला उतरलो आता पुढे काय हा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा होता. या प्रश्नांचे उत्तर शोधत आम्ही पुणे स्टेशन मधून बाहेर पडलो. बाहेर पडताच पुणेची खासियत असलेले पुणेरी पाट्यांचे दर्शन झाले. पहिली पाटी होती पुणे स्टेशनबाहेर "दुध झेरॉक्स" आणि खाली बाण दाखविला होता. बाजूला दुसरा बोर्ड होता "महाराष्ट्र शासन दुध सरिता झेरॉक्स, दुध दर :- , रु. लिटर" आता या दोन बोर्डचा अर्थ काय असेल याचा विचार करीत आम्ही पुढे गेलो. नक्की दुधाची झेरॉक्स काढून मिळेल का? कि झेरॉक्स केलेलं दुध लिटर मध्ये मिळेल कि अजून काही!!! 
पुढे आम्ही चहा घेतला आणि सोबत क्रीम रोल पण आणि चहा पिउन झाल्यावर समजल कि एका कटिंग चहा ची किंमत होती फक्त रु. १० नक्की "शुगर" होती कि अजून काहि याबाबत आम्ही "शुअर" नव्हतो. एका कटिंग चे फक्त रु.१०/- आमचे शक्तिमान सचिन रेडेकर बंधू भडकले. "तू मुंबई मी आ तेरे को फ्री मी चाय पिलाता हु" असे "धमकीवजा निमंत्रण" पण दिले. अर्थातच त्याने ते निमंत्रण स्वीकारले नाही कारण एकतर सचिन बंधूंची शरीरयष्टी आणि दुसर म्हणजे ट्रेनची तिकीट परवाडणारी नव्हती त्याला. तिथून सचिन दादांना आम्ही लवकरात लवकर हलाविले नाहीतर थोड्या वेळात सचिन बंधूनी त्या चहावाल्याला हलाविले असते एवढ नक्की!! 
आम्ही पुढे गेलो पुढे चौकशी केली ६ वाजेपर्यंत गाडी नाही ! मग करायचं काय इतका वेळ? चालत जायचं? बसायचं कि झोपायचं? मी आणि राज दादा झोपायचं या मताबाबत ठाम होतो. पण नंतर नितीन दादा रिक्षावाल्यांशी हितगुज करत होता एक रिक्षावाला १५० रुपये सांगत होता मग आम्ही रस्त्याच्या दुस-या बाजूला उभे राहिलो तिकडे नितीन दादांनी एका "दाढीधारी" रिक्षावाल्याला गाठले आणि चर्चा करू लागले चांगली १० - १५ मिनिटे चर्चा केल्यावर नितीन दादांनी आम्हाला बोलावून घेतले आम्हालां वाटल नितीन दादांच्या बोलबच्चन चा परिणाम झाला कि काय? म्हणून आम्ही रस्ता ओलांडून आणि इच्छा नसतान डीवायडर ओलांडून पलीकडे गेलो तर काय फूस....… तो रिक्षावाला तर ३० - ४० रुपये जास्तच मागत होता. पुन्हा आम्ही निराश हताशपणे निघालो आम्हाला समजल कि पलीकडच्या रस्त्यावर थोड्याच वेळात एक बस येणार आहे. थोड बर वाटल आम्ही Bus Stop जवळ आलो तिथे अजून "दाढीधारी" माणूस भेटला तो तर म्हणजे ४ मिनिटात बस येणार पण पुढची ४० मिनटे तरी गाडी आलि नसेल नंतर एक बस दिसली हडपसरला जाणारी आम्हाला ट्रेन च्या मागे धावायची सवय होती आम्ही धावत त्या बस च्या मागे गेलो आणि जागा पकडली चक्क जागा मिळाली. मस्त गुलाबी थंडी लागत होती. पण ती हळूहळू ती गुलाबी लाल, काळी, निळी, पिवळी होतेय कि काय अस वाटू लागली अंतर तस बरच होत त्यामुळे मी पुन्हा डोळे झाकून विचार करायचं ठरवल. नंतर जाग आलि तेव्हा समजल हडपसर ला आलोय. शिस्तीत उतरून आम्ही तिकडे थांबायला पाहिजे होत. पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही तिथे न थांबता आमच्या नितीन दादांच्या "संकल्पनेतून" आम्ही सर्वांनी सासवड जायचं हे ठरलं. मी काय, मला न्याल त्या गाडीत बसायचं होत आणि ध्यान करत करत प्रवास करायचा होता. आमच नशीब इतक चांगल (कि वाईट) आम्हाला हडपसर वरून लगेचच सासवड बस मिळाली. त्या S.T. मध्ये आम्ही बसलो आम्ही ७ जण आणि दुसरे काही २ जन आणि ड्रायवर कंडक्टर असे मिळून आम्ही तब्बल १० ते ११ जण आम्ही दाटीवाटीने त्या S.T. मध्ये बसलो. तिकीट काढली पण जशी S.T. सुरु झाली तशी आम्हाला जाणीव झाली कि आम्ही साध्यासुध्या S.T. मध्ये नाही बुलेट S.T. मध्ये बसलोय. अस वाटत होत एकदा जाऊन तिकीट चेक कराव नक्की S.T. च आहे का विमानच…. अस वाटत होत हि बुलेट S.T. कधी थांबणारच नाही. दे दणादण .S.T. उडवत (अक्षरश: उडवतच) ड्रायवर S.T. चालवत होता. मग फार विचार न करता मी पुन्हा ती गुलाबी थंडी(गुलाबी कसली सप्तरंगीच म्हणा ना ! ) आम्ही उडणा-या S.T. तून सासवडला पोचलो उतरताना ड्रायवरचा चेहरा बघायची इच्छा झाली, बघितल नक्की "महेश दादा" तर नाही ना! पण नाही महेश दादा नव्हता! तेव्हा मला विश्वास पटला महेश दादापेक्षा पण "भयंकर" गाडी चालवणारा कोणी आहे. तिकडे "सासवड" ला गेल्यावर समजल कि आपल्याला "सासवड" ला यायचच नव्हत आपल्याला "हडपसर" वरून थेट "वाघोलि" ला जायचं होत. मग आम्हाला समजल आमच्या पुणे स्टेशन वरील "क्रीम रोल" चा "लोकार्पण सोहळा" सासवड ला आयोजिण्यात आला होता आम्ही सर्वांनी तो "सोहळा" व्यवस्थितपणे पार पाडून आमचा "बस-बस" चा खेळ खेळायला निघालो. आणि पुन्हा त्या बस मध्ये बसलो आता जरा आमचा स्टेट्स वाढला होता जरा नवीन बस होती. जरा Modern बसबधून आम्ही "बस - बस" खेळणार होतो.(प्रवास करणार होतो). हा खेळ माझ्या एवढा अंगाशी येत होता कि मला सारख डोळे मिटून ध्यान कराव लागत होत. तस नसत केल तर नक्कीच माझ "व्याकि - व्याकी" झाल असत. तोपर्यंत उजाडल होत. सचिन जगताप दादा आणि अजय आठवले दादा(सह्याद्रिचा भक्त) यांचे फोन सुरु झाले होते. आता आमचा "बस - बस" चा खेळ जवळपास संपला होता. पुढे अजून खूप काही बाकी होत. अजय दादांनी "अल्टो गाडी" पाठवली होती आता मात्र आम्हाला सर्कस करावी लागणार होती एक अल्टो कार आणि ड्रायवर सहित ८ माणस अशक्यप्राय अशी गोष्ट आम्ही शक्य करणार होतो. पुढे ड्रायवर सहित सुरज आणि नील दादा मागे नितीन दादा, मोनीश दादा, सचिन दादा त्याच्यावर राजा दादांना "फोल्ड करून" ठेवल होत आता राहिला माझा प्रश्न मी कसबस माझ "अर्ध शरीर" आत घुसवल विचार करत होतो "अर्ध शरीर" कुठे ठेवायचं आणि कुठे केले Adjust तर दरवाजा लावायला रस्त्यावरच्या लोकांना हाक मारायला लागणार होती एवढ नक्की. आम्हा सर्वाना वाटत होत आंम्ही नक्कीच दुस-या बाजून बाहेर जाणार कि काय पण दुस-या बाजूला नितीन दादानि बाजू लावून धरल्याने प्रश्न माझाच होता मग थोडी सीट Adjust करून माझा मध्यम बांध्याच शरीर मी कसबस आत घेतलं. दरवाजा लागला. तेव्हा आम्हा सगळ्यांना कळून चुकल होत "कोंबण" किंवा "कोंबून भरणे" म्हणजे काय? अल्टो थेट गेली अजय दादांच्या घरी त्याअगोदर तिथल्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही अजय दादांच्या घराच्या दिशेने निघालो. तिथे आमच उत्साहात स्वागत झाल.पहिला चहा मग फ्रेश झालो मग पुन्हा नाष्टा आणि कोल्डड्रिंक असा आमचा एकूण आहार झाला. (थोडा वर्णानुक्रम चुकला पण चालायचं). नंतर आम्ही तुळापुर दिशेन जायला निघणार होतो तिथे सचिन जगताप दादा आणि नीलकंठ दादा येणार होते. आता पुन्हा ते "कोंबणे" म्हणजे काय हे आम्हाल अनुभवाव लागतंय कि काय अस मला वाटल. पण दोन बाईक आणि गाडीत आम्ही हम दो हमारे दो (म्हणजे ४ जण हो!!) जण असा छोटा आणि सुखी परिवार घेऊन तुळापुर च्या दिशेन निघालो( आम्ही तुळापुर आणि वढू येथे काय काय अनुभवलंय हे दुस-या भागात तुम्हाला सांगेन). आमच तुळापुर आणि वढू दर्शन झाल. आणि पुन्हा "हम दो हमारे दो" असा परिवार अल्टो मध्ये आणि "१ + १ = २" असा साध गणित बाइकवर करत आम्ही अजय दादांच्या घरी आलो. अजय दादांच्या घरी पुन्हा वाहीनिनी सुंदर जेवणाचा बेत केला होता. चपाती, श्रीखंड, भाजी,पापड, भात,डाळ सगळे अक्षरश: राक्षसासारखे जेवत होते(मी पण हा!!). नेहमी मोहिमेला पाणी जास्त पितो त्यामुळे जास्त जेवण जात नाही असा युक्तिवाद हि करण्यात आला. मध्येच "आठवले वहिनीनी" विचारले जेवण कसे झाले. पण ज्या पद्धतीने आम्ही सगळे "घपाघप" जेवत होतो त्यावरून त्यांना कल्पना आली असेल. जेवण झाल आम्हाला "आठवले" बंधूंच्या मुलीने जेवण वाढण्यापासून मदत केलि. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली अजय आठवले बंधूंचे मुलींवरचे संस्कार. सलाम अजय दादा! त्यांची लहान मुलगीसुद्धा आम्हाला जेवण वाढण्यात मदत करीत होती. जेवण झाल आता थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून आम्ही बाहेर अंगणात पडलो साधारण अर्धा तास वामकुक्षी घेऊन आता परतीचा प्रवास करायचा होता. सर्व तयारी झाली, दादांची मुलगी आम्हा सर्वांच्या पाया पडली.(शेवटी संस्कार होते ते). आणि आम्ही निघालो पुन्हा बस पकडली आणि थेट पुणे स्टेशन गाठायचे होते. साधारण ५:५० दरम्यान ट्रेन होती थेट मुंबई ची आम्ही लवकर गेलो त्यामुळे बसायला जागा तरी मिळाली. नंतर आम्ही सर्वच डोळे झाकून विचार करत करत मुंबईला पोचलो. 
या संपूर्ण प्रवासात आम्ही अनुभवला बस बस चा खेळ…. आणि काही क्षण हसरे कधीही न विसरता येण्यासारखे…. 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Wednesday, 3 April 2013

मन वेडेच असत ग...

कोणावर तरी जीव लावलास 
यात तूझे तरी काय चुकले 
आपल्या परक्यांना ओळखण्यात घोळ केलास 
हे कुठेतरी खटकले

ज्यांच्या दुखात सामील झालीस 
त्यांनीच दूर लोटले 
"त्या" स्वार्थी मनाला आपले मानलेस 
हे तरी कसे तुझ्या मनास पटले 

मन वेडेच असत ग 
त्याची समजून नेहमीच  काढावी लागते 
समजूत काढता काढता सहज 
त्या वेड्या मनाला फसवावे लागते

बर केलस वेळीच ओळखलस 
एकटेपणाला आपल मानलस 
पण चूकशील पुन्हा तू जर,
या एकटेपणाच्या नादात दुखाला कवटाळलस… गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...