Friday, 28 February 2014

दुर्गवीर सोबतची माझी 2 वर्ष


दुर्गवीर सोबतची माझी २ वर्ष


नुकतेच २६ फेब्रुवारी २०१३ येउन गेला तसा हा दिवस इतरांसाठी सामान्य पण बरोबर २ वर्षापूर्वी दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी माझी भेट दुर्गवीरांशी झाली. नितीन पाटोळे बंधूनी फेसबुक वर केलेले आवाहन (आव्हान) स्वीकारून मी दुर्गवीर च्या सूरगड मोहिमेत सहभागी झालो. पहिल्यांदा अनेक प्रश्न मनात होते कोण असेल दुर्गवीर, श्रमदान म्हणजे नेमक काय करीत असतील असे आणि अनेक…. पण जसजसा मी दुर्गवीर सोबत वेळ घालवत गेलो तसे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. दुर्गवीर सोबतच पाहिलं श्रमदान सुरगडावर त्यावेळी मनात एक उर्मी होती मनात काहीतरी करून दाखविण्याची. मोनीश चौबळ, चंद्रशेखर पिलाने ह्यांची सुद्धा हि पहिली मोहीम होती. अपेक्षेप्रमाणे मला तिथे फक्त हे "शिवकार्य" आपले "कर्तव्य" मानणारी माणसे भेटली. प्रत्येकजण आपल्या वाटेला आलेले काम ईर्षेला पेटून करत होता. कुणाच्या मनात कुठला अहंकार नाही कि गर्व कि मोठा नि तो लहान सर्व एकत्र येवून काम करत होते. जसे काम एकत्र तसेच नाशिककरांनी बनविलेली खिचडी पण मनापासून खात ती मोहिमे पार पडली. त्या मोहिमेनंतर फारश्या मोहिमा नव्हत्या थेट पद्मदुर्ग मोहीम होती पद्मदुर्ग मुंबईपासून किती दूर आहे तिथे जायला किती खर्च येतो याची मला जाणीव नव्हती पण दुस-या एक संस्थेसोबत मिळून या मोहिमेचे आयोजन केले होते म्हणून त्या मोहिमेचे शुल्क रु.६००/- होते. त्यावेळी मनात विचर आले एवढे कसले पैसे हे इतरांसारखे लुटतात कि काय वगैरे पण त्या दिवशी अजित राणे यांना डोंबिवली स्टेशन ला भेटलो आणि त्यांनी त्यांच्या पद्धतिने मला समजाविले. मग मला समजल मी जो "दुर्गवीर" बद्दल विचार केला तो चुकीचा होता. खरच "नितीन बंधू" मुळे मी दुर्गवीर मध्ये "सामील" झालो, "अजित दादा" मुळे मी दुर्गवीर मध्ये "टिकलो" आणि "संतोष दादा" मुळे मी दुर्गवीर मध्ये "घडलो" कारण संतोष दादाने मला त्यांच्या नकळत खूप शिकविले. संतोष दादाच्या वाणीत एक जादू आहे. त्याने बोलाव आणि समोरच्याने ते ऐकावं आणि नकळत त्याच्या बोलण्याला सहमती द्यावी. संतोष दादाने १ मे अगोदरच्या अवचितगड मोहिमे नंतर माझ काम पाहून माझ काम पाहून मला दिलेली शाबासकी मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यावेळी दादा मला उद्देशून एक वाक्य बोलला कि " तुझ्यासारखे १५-२० मावळे असतील पूर्ण गड बांधून काढू" या शाबासकीने मला तर १० हत्तींच बळ आल्याप्रमाणे वाटत होत. त्यानंतर मला स्वताला कधी जाणवलंच नाही कि कोणी वेगळा आहे. एका कुटुंबातील सदस्य जसे एकत्र यावेत तसे आम्ही दुर्गवीर दर शनिवार रविवार किंवा सुट्टी च्य दिवशी एकत्र यायचो. मला आयुष्यात कुठलेच व्यसन नव्हते पण दुर्गवीरमुळे या गडकोटाचे व्यसन लागले एखाद्या सुट्टीच्या दिवशी घरी बसलो कि घर खायला उठायचं मग आम्ही दुर्गवीर जवळपास प्रत्येक सुट्टीच्या दिवशी गडांवर जायला लागलो. कधी श्रमदान मोहीम तर कधी गडदर्शन, कधी शालेय वस्तू वाटप तर कधी इतिहास संकलन.


गेल्या दोन वर्षात दुर्गवीर ने मला काय दिल?? एक दृष्टीकोन इतिहासाकडे बघण्याचा याअगोदर माझ्यासाठी इतिहास हा फक्त शाळेतील मार्कांपर्यंत मर्यादित होता. पण इथे मी इतिहास जगायला शिकलो. एखादे ऐतिहासिक विषयावरील पुस्तक वाचताना ते नुसत्या "डोळ्यांनी वाचण्यापेक्षा" "मनाने वाचायला" शिकलो. एखाद्या विषयावर लिहिताना शब्दांची जुळवा जुळव करण्यापेक्षा आपला विषय सुस्पष्टपणे मांडायला शिकलो. बोलण मला फारस जमल नाही पण जे बोलायचं आहे ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी योग्य माध्यमातून मांडायला शिकलो. हे सर्व मला दुर्गवीर ने अवघ्या दोन वर्षात शिकवलं.

दुर्गवीर परिवारात येण्याअगोदरहि मी लिखाण करयचो, कविता करायचो पण ते एका चौकटी मध्ये बंदिस्त होत. पण आता मी वेगवेगळ्या विषयावर लिहायला शिकलो. मी या अगोदर Orkut च्या Community वर लिखाण करायचो पण ते फारस लोकांपर्यंत पोचत नव्हत पण दुर्गवीर मध्ये आल्यावर मी माझे अंतरंग हे पेज व  http://dhiruloke.blogspot.in/ हा ब्लॉग सुरु केला आणि माझ्या कवितां सोबत विविध सामाजिक विषयांवरील लेख, प्रवास वर्णन लिहित गेलो. नकळत माझ्या पेज, ब्लॉग चे अनेक वाचक निर्माण झाले. एखादा लेख चांगला झाला कि नुसत्या फेसबुक Comment/Like वर न थांबत फोन/मेसेज करून माझे कौतुक केल जात तेव्हा ती शाबासकी माझ्यासाठी सर्वात मोठी असते. मधल्या काही दिवसात मी कामातल्या व्यस्ततेमुळे लिखाण करू शकत नव्हतो. तेव्हा "आम्ही तुमच्या लेखाची वाट पाहतोय" अश्या प्रकारचे मेसेज मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत होते. माझ्या एका वाचकाने जेव्हा माझा एक लेख वाचून मला फोन केला त्या वाचकाने स्वत: तर माझे कौतुक केलेच पण जेव्हा त्यांची आई मला सांगत होती तू खूप मनापासून लिहितोस आजकालची मुल असा विचार करतात हे पाहून बर वाटलं, खूप मोठा हो! खरच आईंचा तो "आशीर्वाद" माझ्या साठी सर्वात मोठा "पुरस्कार" होता. एखाद्या स्टेशन ला उभे असताना अनोळखी येउन विचारतात तुम्ही "दुर्गवीर वाले" ना… त्यावेळी समजत दुर्गवीर या नावात किती ताकद आहे. पण हे सर्व कौतुक होत असताना एक जाणीव होत होती जितका लोक तुमचा आदर करतात तेव्हा तितकी तुमची जबाबदारी वाढते. सार्वजनिक ठिकाणी बोलताना, वागताना हे भान ठेवावे लागते कि आपण एक "दुर्गवीर" आहोत. भावनेच्या भरात येउन केलेले कृत्य किंवा विधान "दुर्गवीर" या नावाला गालबोट लावू शकते.

गेल्या काही दिवसात घरच्या जबाबदा-यां मुळे या कार्याकडे थोडस दुर्लक्ष झालय. आज-काल मी सुट्टीच्या दिवशी घरी आहे हे बघून माझ्या नातेवाइकांनाहि आच्छर्य वाटत. पण लवकरच मी माझ्या श्रमदान, गडदर्शन च्या मोहिमांचा "सपाटा" लावणार आहे. बघू दैव कितपत साथ देताय ते मला….
जय शिवराय!!!
          

Wednesday, 26 February 2014

गरज

कुणी नेहमीपेक्षा चांगल वागतंय की समजायचं "तुमची गरज लागलीय" कुणी नेहमीपेक्षा वाईट वागतंय की समजायचं "त्यांची गरज भागलीय...