पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन





पुनच्छ पद्मदुर्ग दर्शन……


आज ब-याच कालावाधीनंतर पुन्हा पद्मदुर्ग चे दर्शन होणार म्हणून उत्सुकता होती. नेहमीप्रमाणे सुरुवात झाली दादर स्वामी नारायण मंदिरापासून तिथे सर्व एकत्र जमलेले मी थोडा लेटच पोहोचलो होतो (हिरो ची इंट्री उशिरा होते अस ऐकल होत कुठेतरी). भेटल्यावर जय शिवराय, जय शिवराय जयघोषात आम्ही सर्व दुर्गवीर बंधू एकमेकांची भेट घेऊ लागलो. नंतर काही वेळातच आमचा बसचा प्रवास(खरच "बस आत्ता" असा म्हणायला लावणारा प्रवास) या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त दुर्गप्रेमींनी या पद्मदुर्ग मोहिमेस हजेरी लावल्याने मला हवी असलेली "विंडो सीट" हातातून जाणार हे मी अगोदरच माझ्या "दिव्य दृष्टीने" जाणले होते. मुंबई विभागातून तब्बल ४० च्या आसपास दुर्गप्रेमी या मोहीमेत सहभागी झाल्याने माझी Transfer स्वित्झर्लंड वरून राजस्थान मध्ये होणार हे पक्क होत त्यानुसार जेव्हा मी "बस" मध्ये "घुसलो" ते थेट बसच्या "शेवटच्या सीटवर" "बसलो". (ह्यालाच म्हणतात स्वित्झर्लंड वरून राजस्थानला Transfer) असो मग रात्रभर आमच "गरीब बिचार शरीर" वेगवेगळ्या प्रकारे दुमडून आम्ही प्रवास केला. या माझ्या या "योगा" प्रवासात राज मेस्त्री. प्रशांत वाघरे, अमित शिंदे यांनी मोलाची साथ दिली. गाडीचा ड्रायव्हर जणू नुकताच "नासा" मधून राजीनामा देवून आल्याप्रमाणे बस चालवत(पळवत, हाकत) होता. कदाचित नासाने त्याला "ओव्हर स्पीड" ने यान चालवलं म्हणून "कामावरून काढलं" असावं.


अखेर पहाटे ४-५ च्या सुमारास आम्ही पद्मदुर्ग च्या जवळ असलेल्या गावात पोचलो तिथे पुणेवरून आलेले २० दुर्गवीर आमच्या सोबत आले. नंतर सगळे मिळेल ती जागा पकडून झोपी गेले. आता इथेही मी थोडा लेट झालो आणि झोपायला जागा न उरल्याने मी बेघर माणसाप्रमाणे जागा शोधू लागलो शेवटी एका खोलीत एक "खाट" होती पण तिथेही Bag असल्यामुळे आम्ही सरळ "खाट" च्या "खाली" आमचा बेड तयार करून झोपलो… सकाळी उठून फ्रेश झाल्यावर पोहे आणि चहा वर ताव मारून आम्ही सारे दुर्गवीर ठरल्याप्रमाणे निघालो "पुनच्छ पद्मदुर्ग" दर्शनासाठी…… सुरुवातीला सर्वांची बोट मध्ये बसण्यास धडपड सुरु झाली तब्बल २ मोठ्या व एक छोटी बोट भरून आम्ही जाणार होतो. एक मोठी बोट पुढे निघून गेली दुसरी मोठी बोट सुद्धा भरली. नंतर मी, संतोष दादा, प्रशांत वाघरे, नितीन पाटोळे आणि ४-५ जण छोट्या बोटीत बसणार होतो.


आम्ही सर्व बोट मध्ये आसनस्थ झाल्यावर आमची "बोट" "पाण्याचा प्रवाह कापत" पुढे जाऊ लागली जणू "मावळे" "गनीमांना कापत" पुढे जातात. पुढे "हर हर महादेव"च्या जयघोषात आम्ही पुढे जाऊ लागलो. गडावर पोचल्यावर प्रथम सर्वांची ओळख परेड झाली. संतोष दादांनी मोहीम कशी पार पाडली जाईल याची माहिती दिली. ओळख झाल्यावर सारे नवीन व प्रथम आलेले दुर्गवीर (हो कारण आता सर्व दुर्गप्रेमी "दुर्गवीर" झाले होते) गड दर्शनासाठी गेले आम्ही काही मोजकेजण प्लास्टिक पिशव्या घेऊन गडावर इतरत्र टाकलेला प्लास्टिक कचरा गोळा केला. सारे दुर्गवीर गड --पाहून झाल्यावर आमच्या सोबत सामील झाले. हा हा म्हणता जवळपास ७-८ मोठ्या पिशव्या भरून कचरा गोळा केला.


गड फिरताना एक गोष्ट लक्षात आली कि महादरवाजाच्या समोरील भागात एका मंदिराचे अवशेष होते पण तेथील मूर्ती त्या जागेवर नव्हती आसपासच परिसर न्याहाळल्यावर ती मूर्ती बुरुजाच्या बाहेर समुद्राच्या दिशेने टाकली होती.(ती कोणी फेकली हे वेगळ सांगायला नको) मग आम्ही दुर्गवीर गड संवर्धना सोबत संस्कृती/धर्म रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलो. ती किमान ५०-६० किलोची मूर्ती ४-५ दुर्गवीरांनी उचलून ठेवली(तस सचिन रेडेकर बंधू एकटेच "काफी" होते). ती देवीची मूर्ती इच्छित जागेवर ठेल्यावर मनाला एक शांती मिळाली. ती मूर्ती जागेवर स्थानापन्न झाल्यावर आनंद मिळाला ख-या देवपूजेचा….या मोहिमेत एक बाब प्रकर्षाने जाणविली ती म्हणजे या मोहिमेत तब्बल १२-१३ महिलांचा सहभाग होता यात छोट्या छोट्या ताई पासून मोठ्या आईंचाही सहभाग होता.

अखेर मोहिमेचा उत्तरार्ध सुरु झाला. शेवटी महराजांची आरती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. नंतरचा डाळ, भात, लोणच, पापड, भाजी, चपाती यावर अक्षरशा तुटून पडत आम्ही जेवलो.

पुन्हा आम्ही सर्व एकत्र जमलो. सर्व नवीन दुर्गवीरांनी आपले या मोहिमेबद्दल व दुर्गवीर च्या कार्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येकजण दुर्गवीर च्या कार्याचे परिणामी आम्हा सर्व "दुर्गवीर शिलेदारांचे" कौतुक करीत होता ते ऐकून कान सुखावत होते पण आपल्यावरील लोकांच्या विश्वासाची आणि विश्वासातून आलेल्या जबाबदारीची जाणीव आम्हाला होत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने दुर्गवीरच्या कार्यात सहभागी होण्याचे वचन देत होता. माझ त्या सर्वांना एक आवाहन आहे कि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यातून तुम्हाला हे शिवकार्य पुढे कसे नेता येईन याचा प्रयत्न करावा. या दुर्गवीरां मध्ये काही शिक्षक होते त्यांनी त्यांच्या शाळामध्ये य कार्याचा प्रसार करावा व मुलांना या दुर्गदर्शन, श्रमदान मोहिमेत सहभागी करून घ्यावे, शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. काही Animation, Editing या क्षेत्रातील होते त्या दृष्टीने काही माहितीपट (Video Clip) असे आणि इतर प्रकारे आपला सहभाग या शिवकार्यात ठेवावा.

या संपूर्ण मोहिमेत मी खूप काही अनुभवले. दुर्गवीर बद्दल इतर किती चांगला विचार करतात आणि आम्हा दुर्गवीरांकडून कोणत्या कार्याची अपेक्षा ठेवतात याचा पुर्नप्रत्यय आला….

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….