हसू आणि आसू @ मोहीम मानगड - भाग १





हसू आणि आसू -  भाग १

दुर्गवीर सोबतची माझी मानगड, खुर्डूगड मोहीम दोन वेगवेगळे अनुभव देणारी ठरली.  संपूर्ण प्रवासात मनमुराद हसविणारे हसरे असे आणि खुर्डूगड च्या जवळ असलेल्या प्राचीन मंदिर व वीरघळीची अवस्था बघून मन पिळवटून टाकणारे असे दुहेरी अनुभव आले . या  लेखात मी मनमुराद हसविणारे अनुभव मांडणार आहे.  
खर तर मी ट्रेन ने जाणार होतो पण ऐनवेळी प्रशांत बंधूनी जास्त रिस्क नको म्हणून मला कामावरून थेट दादरला येण्याचे आवाहन केले.  गाववाला असल्याने आवाहनाला प्रतिसाद देत मी दादर ला पोचलो.  तिथे  संतोष दादा, राज दादा, नितीन दादा अगोदर हजर होते. थोड्यावेळात गाडी आली ह्या वेळी गाडी जरा हाय-फाय होती (दिसायलाच हाय-फाय  बर का?). गाडीतून आशिष बंधू, प्रशांत बंधू, निहार बंधू आले.सोबत शिवरायांची सुबक मूर्ती होती.   पुढे प्लान थोडा चेंज झाला आणि प्रशांत बंधू ट्रेन ने जायला निघाले तेव्हा मला हि गाडीत करमत नसल्याने मीहि सोबत गेलो.(इथे गाववाला हा Criteria लागू होत नाही हा!!).   पनवेल ला दिवा रोहा आली तेव्हा अजून एक धक्का बसला. माझ्या माहितीनुसार ट्रेन मधून फक्त अजित दादा येणार होता. पण पाहतो काय!!  सचिन रेडेकर,  सुरज कोकितकर, आणि मुख्य म्हणजे दुर्गवीर चे "शाहीर" "हरी ओम" फेम अनिकेत तमुचे यांचे दर्शन झाले. सोबत दुर्गवीरांगणा ओजास्विनी पावशेहि हजर होत्या.  ट्रेन मार्गाला लागली, आमच्या गप्पा गोष्ठी सुरु झाल्या. माझ्या बाजूला सचिन रेडेकर बंधू होते त्यामुळे मी गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता. (तस माझ्या बाजूला सचिन रेडेकर ऐवजी सचिन तेंडूलकर बसला तरी मी काय बोलणार…) एका बाजूला शाहीर अनिकेत तमुचे, ओजस्विनी ताई आणि सुरज बंधू यांच्यात ऐतिहासिक विषयांवर चर्चा चालू होती. मी अधून मधून आगंतुक पाहुण्यासारखा त्यांची चर्चा ऐकत होतो.  दुस-या बाजूला प्रशांत आणि अजित दादा यांची शाळेतील गमती जमती वर चर्चा चालू होती.  त्यांच्या चर्चेतून मी Their आणि There यातील  फरक कसा ओळखावा याच ब्रम्हज्ञान शिकलो आणि त्यावर आम्ही मोहीम संपेपर्यंत हसत होतो. ते ज्ञान काय होते ते तुम्हाला प्रशांत आणि अजित दादा देतील.  नंतर एकदाचे पोचलो नागोठणे ला तिथून डेपो मध्ये जाण्यासाठी आणि तिथून पुढे जाण्यासाठी धडाम-धुडूम एस.टी. पकडायची होती.  डेपोत येणारी प्रत्येक एस.टी. आपल्यासाठी असा गैरसमज करून घेत आम्ही येणा-या प्रत्येक एस.टी. कडे धावत जात होतो. नंतर आम्हाला जाणीव झाली कि एस.टी. महामंडळाचे जावई नाही तेव्हा एस.टी. हि तिच्या वेळेवर येणार. नंतर आलेली एस.टी. पकडली आणि चक्क आम्हाला बसायला जागा मिळाली कारण नागोठणे वरून येताना आम्ही मिळेल त्याजागेत बसून जागा मिळवली होती अर्थातच त्यावेळी आमच्यापैकी एकालाही जागा मिळाली नाही. पण डेपोतून पकडलेल्या एस.टी.त आम्हाला बसायला जागा मिळाल्याने आम्ही सर्वजण निवडणुकीचे तिकीट मिळालेल्या उमेदवारासारखे खुश झालेलो.  शेवटी एकदाचे पोचलो गावात तिथे आमची हाय-फाय गाडी मागून आली.  आता काही लोकांनी  पुढे जायचं हे ठरल आम्ही गाडीने पुढे गेलो दुर्गवीर रामजी कदम यांच्या घरी, तिथे  मूर्ती उतरून ठेवली, रात्री साठी आवश्यक चादरी घेऊन आम्ही गावातील एका शाळेत विश्रामासाठी गेलो. तिथे भाकरी, चटणी, लोणच, फरसाण, शेंगदाणे अश्या आगळ्या वेगळ्या जेवणावर आडवा तिडवा हात मारत आम्ही जेवलो आणि चादरींची ओढाओढ करून झोपी गेलो. या चादरींच्या ओढाओढीत आमच्या निहार बंधूंची ७फुट X ३ फुट असलेली चादर साधारण  ८फुट X४ फुट झाली असावी.  रात्री मध्येच अमित शिंदे आणि प्रज्वल पाटील आले, तेव्हा तर गनीम आले कि काय या अविर्भावात मी उठून बसलेलो पण स्वकीय आहेत हे समजून निश्चिंत झोपलो. पण शेवटी प्रज्वल बंधूनी आमच्या चादरीवर आक्रमण केलेच. पण मीही त्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिल. शेवटी सकाळी अजित दादा आणि संतोष दादांनी सर्वांना उठविले.  थोड फ्रेश होऊन आम्ही मानगड सर करायला निघालो. 
गडावर जाताच संतोष दादाच्या योजनेनुसार मुख्य दरवाजाच्या ठिकाणी काही पाय-या जमिनीत गाडल्या गेल्या होत्या त्या बाहेर काढणे, दरवाज्यात पडलेल्या मोठ्या शीळा बाजूला करून वाट मोकळी करणे, हे आजच्या मोहिमेचे उद्दिष्ट होते.  त्यानुसार आम्ही श्रमदानास सुरुवात केली.  दादाने आम्हा सर्वाना काम विभागून दिली.  जड माणस जड दगड उचलण्यासाठी वेगळी केली गेली. मी, प्रश्नात वाघरे सचिन रेडेकर, अमित शिंदे दगड उचलू लागलो.  प्रशांत बंधू हाडाचे इंजिनिअर असल्यामुळे ते दगड वर चढविण्यासाठी कुठून कुठे उचलून  ठेवायचा हे सांगत होते त्यानुसार आम्ही ते दगड उचलत होतो.  कधी कधी आम्ही २-३ जण मिळून एक दगड वरती मोठ्या मुश्किलीने नेत होतो. वर गेल्यावर सचिन रेडेकर अगदी सहजतेने ते दगड एकट्याने नेत होते. कदाचित त्या दगडांनाहि लाज वाटली असेल सचिन दादांचा तो अवतार बघून.  इतके वर्ष ज्यांना कोणी जागेवरून किंचितही हलवू शकले नाही त्या दगडांना सचिन बंधू एकट्याने बाजूला करीत होते.  बाकीचे दुर्गवीर आजूबाजूची माती काढून एका ठिकाणी जमा करीत होते. त्यात दुर्गवीरांगणा ओजास्विनी ताईहि मागे नव्हत्या. मध्येच आलेल्या उपमावर यतेच्छ ताव मारून पुन्हा जोमाने कामाला लागलो.  हा हा म्हणता बरेचसे दगड आणि माती आम्ही बाजूला काढली होती. अधून मधून शिवरायांचा जल्लोष चालला होता.  अजूनही खुर्डू गडच्या पायथ्याशी असेलल्या पुरातन मंदिराला भेट द्यायची होती म्हणून गडावरची हि मोहीम आटोपती घेतली. श्रमदानाच सर्व साहित्य धुवून थोड फ्रेश होऊन मारुतीरायाला, शिवरायांना आणि मानाच्या मानगड ला वंदन करून गड उतरायला सुरुवात केली.  तिथूनच खुर्डूगडाच्या जवळ असलेल्या मंदिराच्या दिशेने जायला निघालो. या मंदिरात आम्ही काय अनुभव घेतले ते दुस-या लेखात मांडेनच 
मंदिरातून जाउन आल्यावर आम्ही परतीचा प्रवास  करणार होतो . त्यागोदर आम्ही एके ठिकाणी चहापाना साठी थांबलो. तिथे स्थानिक पत्रकार दुर्गवीर रामजी कदम यांनी खुर्डूगड च इतिहास सांगितला.  बरचसा इतिहास व संदर्भ माझ्या  लक्षात नाहीत.  पण या खुर्डूगडा वर असणा-या एका गुहेत एक तपस्वी साधू होते त्यांनी बाजी पासलकर यांना एक बाण दिला आणि सांगितले कि हा बाण ज्याच्याकडे राहील त्याचे नाव त्याच्या पराक्रमाने चंद्रसूर्य असेपर्यंत सर्वाच्या स्मरणात राहील, त्यांनी  बाण छत्रपती शिवाजी महाराजांना दिला, अजूनही तो बाण सातारा येथे आहे.  मोघलानी जेव्हा या परिसरात आक्रमण केले तेव्हा येथील गाव, मंदिर उध्वस्त केली येथील गावांच्या नावाचा बदल करण्यात आला. उदाहरण घ्यायचे तर निजामपूर, मशीदवाडी हि गाव त्या मोगली आक्रमणाची बळी पडलेली गाव आहेत. 
त्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो एक तुकडी गाडी ने आणि दुसरी तुकडी ट्रेन ने जायचं अस ठरलं. त्यानुसार मी, अजित दादा, प्रशांत वाघरे, अनिकेत तमुचे, ओजास्विनी पावशे आम्ही सर्व ट्रेन ने निघालो. माणगाव स्टेशन ला ट्रेन पकडली तेव्हा ती  "मांडवी एक्सप्रेस" होती पण ठाणे ला उतरे पर्यंत मला ती "बैलगाडीच" वाटली.  असा हा बैलगाडीचा प्रवास करत आम्ही रात्री उशिरा घरी पोचलो.  या संपूर्ण मोहिमेत अश्या प्रकारे आम्ही अनुभवले मनमुराद  क्षण…… 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….