दर्शन शिवजन्मभूमीचे



दर्शन शिवजन्मभूमीचे… 

दि. ११/८/२०१३ रोजी  आम्ही दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो.  तसे आम्ही वेळेत   निघालो, पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही साधारण ११ ते १२ पर्यंत जुइनगर रेल्वे स्टेशन ला बसून गप्पा मारत होतो ("मह्या" चा "महिमा" बाकी काय).  अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा "मह्या" प्रकट झाला.  आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पटकावली ("व्याकि" ची रिस्क नको म्हणून मी खिडकी पटकावली ) पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधूंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपून एक गडदर्शन.  तोवर सचिन बंधु फोन करून आम्ही कुठे आहोत याची खात्री करून घेत होतो.  पण आम्ही पहाटे पुण्यात पोचणार होतो त्यामुळे त्यांना आम्ही झोपायचा सल्ला दिला त्यानंतर आम्ही जवळपास सर्वच चिंतनात मग्न झालो. मध्येच एके ठिकाणी काळोखातील फ्राईड राइस खाउन पुढचा प्रवास सुरु झाला. शेवटी एकदाचे पहाटे पहाटे सचिन बंधूंच्या घरी पोचलो.  त्यांच्या एका खोलीत आम्ही सर्व जागा मिळेल तसे आडवे तिडवे झोपी गेलो.  सकाळी ७च्या दरम्यान झोपेतून उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली.  श्रमदान मोहीम नसल्याने सर्व अगदी आरामात उठत होते.  इकडे सचिन बंधूनी पहिल्या टप्प्यातील चहा दिला आणि त्यानंतर इडली-चटणी चा नाष्टा येणार होता.  त्यामुळे आम्ही सर्व दातांना धार काढून बसलो होतो.  इकडे नाश्ता तयार झाला.  सर्वांनी दे दणादण इडली चटणी वर तावून मारला. नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे दुर्गवीर ची एक बैठक आटपून पुढे हडसर गडदर्शन मोहीमेचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार आम्ही पुढे निघालो जुन्नर च्या दिशेने. शिवनेरी च्या पायथ्याशी आमचे दुर्गवीर बंधू स्वरूप पुरवंत यांच्या निवासस्थानी आम्ही जायला निघालो. तिथे आम्ही थोडा विश्राम करून चहापान करून पुढे निघालो किल्ले हडसर च्या दिशेन.  खूप लांबवरचा पल्ला पार पाडत आम्ही किल्ले हडसर च्या पायथ्याशी पोचलो पण पायथ्याशी पोचायलाच  इतका वेळ गेला होता कि गड चढाई व पुन्हा परतीचा प्रवास याचे नियोजन काही जमत नव्हते. मग आमच्या प्रशांत वाघरे बंधूनी आणलेली चकली आणि स्वीट थोड थोड वाटून खात आम्ही गड सर करायचा कि परत जाउन शिवनेरी दुर्गदर्शन मोहीम पार पाडायची याचा आम्ही विचार करीत होतो. तेव्हा तिथे काही गावकरी भेटले त्यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला कि पावसाळ्यात चढाई करण्यासाठी हा गड थोडासा धोकादायक आहे शिवाय आम्हाला लवकरच परतीचा प्रवास करायचा होता.  शेवटी आम्ही गावक-यांचा सल्ला मानत परत निघालो खर तर सचिन बंधूंचा थोडासा हिरमोड झाला परंतु त्यामुळे त्यांना पुनच्छ शिवनेरी चे दर्शन होणार होते.  मग ठरलं आम्ही माघारी फिरत पुन्हा शिवनेरी गडदर्शन करायचं ठरवलं.  

ठरल्याप्रमाणे आम्ही किल्ले शिवनेरी च्या दर्शनास निघालो मनात खूप औस्तुक्य होत कि आपण शिवजन्म भूमीचे दर्शन घेणार आहोत.  प्रथम पोचलो शिनेरीच्या पायथ्याशी मनात हुरहूर होती कारण दर्शन होणार तो त्या पावन भूमीच… गडाची चढाई सुरु झाली साधारणपणे कोणताही गड चढाई करतान मन भरून येते त्या शिवकाळाच्या,  शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या आठवणीने. सतत स्वराज्याचे राजे अन शिलेदार आजूबाजूला आपल्या दिमतीला असल्याचा भास होतो.  पण शिवनेरी च्या पायथ्यापासूनच मन अक्षरश: पिळवटून निघत होत. आजूबाजूला एखाद्या गार्डन प्रमाणे झालेलं बांधकाम अक्षरश: या अमुल्य ऐतिहासिक ठेव्याचा अपमान करतय कि काय अस उगाचच मला वाटत होत.  दोन्ही बाजूना सिमेंटीकरण आणि परदेशी झाडांची लागवड!!! का? कशासाठी? एवढ्या पवित्र स्थळाचा काय हा बाजार मांडला होता? ज्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे होते त्याच जीर्णोद्धार / नुतनीकरण कशा करिता? खर तर त्याच संवर्धन व्हायला हव? नुतनीकरण नाही!! पुढे गेलो महादरवाजाजवळ तिथे काहीतरी चुकतंय अस वाटत होत नंतर लक्षात आल मूळ दरवाजा साधारण गोमुखी असावा (असा माझा अंदाज आहे) पण त्यात खुपसा बदल करून तो निमुळता बनविला गेलाय.  का कुणास ठावूक मला त्याक्षणी वढू तुळापुर मोहिमीची आठवण झाली.  त्यावेळी तुळापुर या पवित्र ठिकाणाची होत असलेली अवहेलना पाहून मन असच चूकचुकले होते. पुढे गेलो तर दोन्ही बाजूना लोखंडी बार लावलेले.  पुढे काही ठिकाणी विजेचे खांब उभारलेले, तर कुठे काही लोक सहलीला आल्यावर गार्डन मध्ये बसल्याप्रमाणे बसून डबे खात होते. खिन्न मुद्रेन आम्ही सर्वजण पुढे जाऊ लागलो. जाताना आजूबाजूला एका पवित्र स्थळाच होत असलेल विडंबन पाहत पुढे जाऊ लागलो.  पुढे शिवजन्मभूमी जे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान मानले जाते व याच सुवर्णमयी क्षणाची आठवण म्हणून उभारण्यात आलेली एक शिवजन्माची आठवण. खर तर ती जागा डोळ्यात साठवून ठेवण्याजोगी होती म्हणून आम्ही त्याच्या समोर उभे राहून त्या जागेला डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो, पण त्यात हि खोड्या करणारे भेटलेच.  त्या वास्तूच्या खिडकीत बसून, पाय ठेवून फोटो काढणारे महाभाग हि होते.  तिथे डोक्यात अशी सणक गेली कि एकेकाला धरून धरून आपटावे.  अरे एवढी पवित्र जागा आणि तिथे पाय काय ठेवताय, बसताय काय…. अरे आपल्या सर्वांसाठी ते पवित्र मंदिरा प्रमाणे होते त्याची हि अशी विटम्बना.  या जागेच्या पायरीशी बसून तेथील शांत वातावरणात शिवरायांचे अस्तित्व अनुभवावे असे वाटले म्हणून आम्ही वर जाउन लागलो पण काय तिथेही या मुर्खांचा गोंधळ, आरडा ओरडा…. खरच आज जे काही मी पाहत होतो अनुभवत होत ते महाभयंकर होत.  जिथे शिवरायांच्या आठवणीने मन भरून यायला हवे तिथे त्या पवित्र स्थळाची होत असलेली अवहेलना पाहून मन हेलावून जात होते.  आम्ही त्या मुलाना समजाविण्यासाठी वरती गेलो तर मला तिथे अजून एक दृश्य दिसले तेव्हा मात्र माझा संताप अनावर झाला. एक तरुण FootBall घेऊन तिथे आला होता आता काय बोलणार . मी त्याला समजावले कि हि खेळायची जागा  नाहीय…. खरच जबाबदारीने हात बांधले आहेत नाहीतर ……… तिथून आम्ही निराश होऊनच खाली उतरलो.  पुढे त्यापेक्षा हि भयंकर एक तरुण तर चक्क दारू पिउनच आला होता त्याला स्वात:चा तोल सावरत  नव्हता इतका तो प्यायला होता.  मला सहन होत नव्हत नाईलाजाने मी तिथून निघालो. इच्छा असूनही मी तिथे काही करू शकलो नाही.  मी अगदीच दुबळा असल्याची मला जाणीव होऊ लागली.  शिवरायांचा, त्यांच्या पवित्र स्मृतींचा अपमान करणा-याविरोधात मी काहीही करू शकत नाही यापेक्षा लाजिरवाणी बाब माझ्या आयुष्यात नसेल.  पुढे मी एकाच गोष्टीचा विचार करत होतो, या जागेची होत असलेली विटम्बना पाहून राजेंना किती यातना होत असतील….हे सर्व पाहून गड उतरण्याच्या वेळेला एका तरुणाशी गाठ पडली तो तर चक्क सिगारेट फुंकत होता, प्रथम त्याला मी मराठीत समजावले पण कदाचित मी काय बोलतोय हे त्याला कळाले नसावे.म्हणून मी त्याला हिंदीत समजावले . त्यानेही जास्त न बोलता चटकन ती सिगारेट विझविली. पण दुर्दैव कि आपल्या फास्ट फूड वाल्या तरुणाईला सांगाव लागत कि हे गड-किल्ले तुमच्या पिकनिकसाठी नाहीत. हि मंदिर आहेत आपणा सर्वांची!!  त्यांना सांभाळा.  काय आणि किती बोलणार. या पवित्र स्थळांची होत असलेली विटम्बना आणि त्यामुळे मनाची होत असणारी घालमेल सहन करीतच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

परत आलो आम्ही स्वरूप बंधूंच्या घरी तिथे कांदे-पोहे, जिलेबी आणि कॉफी चा बेत होता. आम्ही सर्व अक्षरश: तुटून पडलो सकाळपासून पोटात अन्नाचा दाणा नव्हता त्यामुळे दाणे दाणे पे लिखा ही खाणे वाले का नाम या ओळींना सार्थ ठरेल असा नाश्ता केला (पण इथे दाणे पोह्यांचे होते हा!! ) इथे स्वरूप बंधू, त्यांचे आई-वडील, स्वरूप बंधूंच्या भगिनी यांचे आदरातिथ्य व त्यांचे वडिलोपार्जित घर (कित्येक वर्ष जून असे घर) पाहून आम्ही गडावर जे अनुभवल ते थोड्या काळासाठी विसरून गेलो. नंतर स्वरूप बंधू व कुटुंबियांशी थोडी चर्चा करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. 

शिवनेरी वरून निघताना मनात खूप प्रश्न होते!!  गडावर जपण्यासारखे खूप काही आहे पाण्याच्या टाक्या, त्याच्या बाजूला असलेली शिवलिंग, एका खडकात असेलेले खोदीव टाके, गडाच्या बाजूला लेणीसदृश्य वास्तू असे खूप काही मग त्या वास्तू जपण्याऐवजी गडावर इतरत्र नूतनीकरण कशासाठी???  ज्या वास्तूची धूळ मस्तकी घेऊन जीवनाचे सार्थक करायला हवे तिथे कसल्या पिकनिक काढायच्या? ज्या वास्तूतील पाणी सुद्धा अमृतुल्य असेल तिथे मध्यपान करून कस काय जाऊ शकतो? जिथे शिवशाहीची धून कानात गुंजायला हवी तिथे कसला हा गोंधळ आणि आरडा ओरडा… कधी थांबणार हे सर्व… 
परत निघताना मनात होती ती फक्त आणि फक्त "चीड"…………। 
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….