निशब्द.... प्रवास अफाट पद्मदुर्गाचा…



निशब्द.... प्रवास अफाट  पद्मदुर्गाचा… 

दुर्गवीर ची  अजून एक मोहिम फत्ते..  निशब्द करून जाणारी (तसा मी निशब्द च असतो म्हणा… ).  याअगोदर मी पद्मदुर्ग दर्शन केल होत पण पण तरीही यावेळी काही वेगळच वाटत होत.  वाटत होत पुन्हा पुन्हा इथे येउन ह्या अफाट जलदुर्गाचे दर्शन घेत राहावे. 
   दि. २३/२/२०१३ ला स्वामी नारायण मंदिर, दादर इथून बसने निघालो. मुंबईहून २७  दुर्गवीर ७ दुर्गवीरांगना  पुण्याहून १० दुर्गवीर असे तब्बल ४४ दुर्गवीर या मोहिमेसाठी हजर राहणार होते. यात अगदी ८-१० वर्षाच्या लहान मुलांपासून ५० - ६० वर्षापर्यंतच्या आई - बाबांचाही सहभाग होता.  यात काही तर सहकुटुंबच आले होते.   आजच्या मोहिमेच खास वैशिष्ट म्हणजे आमचे दोन महत्वाचे दादा अजित दादा, आणि संतोष दादा याची अनुपस्थिती.  त्यामुळे मोहिमेवर निघाल्यापासून सर्व जबाबदारी प्रामुख्याने  मोनिश दादा, नितीन दादा यांच्यावर होती. आणि मोहिमेचा जमाखर्च बघायचा आणि इतर काम आमचे दुर्गवीर बंधू संदीप दादा, आणि सुरज दादा यांच्या वर होती.  तसा प्रत्येक दुर्गवीर आपल काम समजून जबाबदारीने वागणार होता हे नक्की होत.    प्रत्येकाला संपूर्ण मोहिमेची आखणी समजावून सांगून आमचा प्रवास सुरु झाला पद्मदुर्ग च्या दिशेने.  सकाळी ४ च्या दरम्यान मुरुड ला पोचलो तिथे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. ६:३० पर्यंत तिथे आराम करणार होते.  त्यानुसार आम्ही तिथे आराम केला.  सर्व चहा नाष्टा आटोपल्यावर आम्ही पद्मदुर्ग च्या दिशने निघालो.  आता प्रवास होता बोटीने पद्मदुर्ग ला जायचा. दोन बोटीमध्ये आम्ही दुर्गवीर विभागले गेलो. आणि त्या उसळत्या दर्याची साथ घेत आम्ही अफाट पद्मदुर्गाच्या दिशेने निघालो. दुरूनच जंजिरा चे दर्शन झाले पण आम्हाला आस होती ती जंजी-याच्या छाताडावर वसलेल्या पद्मदुर्गाची… जस जसे पद्मदुर्ग च्या दिशेने जात होतो तशी उत्सुकता वाढत होती. समोर पद्मदुर्ग दिसत होता. खवळलेल्या या समुद्रात अगदी ताठ मानेने उभा असलेला पद्मदुर्ग.  आमचे सगळे जुने नवे फोटोग्राफर  त्या पद्मदुर्गाचे ते अफाट आणि रौद्र रूप टिपण्यासाठी धडपडत होते.शेवटी बोट किना-याला लागली आमचे पाउल त्या पावन भूमीत पडले.  पुढे जाण्याअगोदर मोनीश दादांनि पद्मदुर्गच्या बुरुजांचे वैशिष्ट्य सांगितले ते म्हणजे इतक्या वर्षांनंतर या बुरुजांचे दगड झिजले आहेत तरीही त्यात वापरलेला चुना आणि काही तत्सम पदार्थ ते अजूनही शाबूत आहे.  नंतर पुढे सर्वांची ओळख झाली व नंतर सर्व पद्मदुर्गच्या दर्शनाला निघाले.  तिथे सध्या पुरातत्व खात्याने काम करायला सुरुवात केली आहे अशी बातमी आम्हाला मिळाली होती ते काम केलेलं  आम्हाला दिसत होत.   
    संपूर्ण गड फिरताना मन भरून यायचं.  अभिमान वाटायचा त्या राजांचा ज्यांच्याकडे एवढी दूरदृष्टी होती कि त्यांनी भर समुद्रात हे गड उभारला.  अभिमान वाटायचा त्या मावळ्यांचा ज्यांनी हा गड उभारायला आणि सांभाळायला  आपल रक्त सांडलं होत.  आमचे मोनीश दादाच एक वाक्य खूप काही सांगून जात "हा गड अजूनही   सुस्थितीत आहे कारण इथे दगड चुन्यासोबत मावळ्यांच रक्त मिसळल आहे."  खरच इथे हा गड उभारताना सिद्धीला  आपल्या अस्तित्वावर घाला घातला जाणार हे माहित होत म्हणून त्याने गडाच बांधकाम थांबावन्यासाठी खूप प्रयत्न केले.  या गडावर आम्हाला तब्बल ३० - ३५ तोफा  दिसल्या अजूनही तोफा तिथे  असतील.   या तोफांच्या संख्येवरून लक्षात येते कि इथे किती युद्धजन्य परीस्थितिला मावळ्यांनी तोंड दिले असेल. या गडाल रोज रक्ताचा अभिषेक होत असेल. पण तरीही आम्हा महाराष्टाच्या जनतेला या पद्मदुर्गाचे महानपण दिसत नाही.  महाराजांना जंजिरा जिंकता आला नाही हे आपण "कोडगे" होऊन ऐकतो पण एक कोणी उसळून सांगत नाही तुमच्या त्या "सिद्धी" च्या तोफांना न जुमानता "आमच्या मावळ्यांनी" हा गड उभारून दाखवला.  संभाजी राजांनी तर दगडी रस्ताच बनवला होता भर समुद्रात पण कल्याण वर आक्रमण झाले म्हणून शंभू राजेना ती मोहीम अर्धवट सोडावी लागली. अरे सांगा त्या उर्मट सिद्धीला तू तर उंदरासारखा आमच्यावर वार करत होता आम्ही वाघासारखे लढून  तुला शह देत होतो.  वाघ शिकार हि मोकळ्या रानात करतो आणि ती संपवतो हि तिथेच. उंदीर शिकारही कुरतडून, चोरून आणि खातोही लपूनच.  अरे असेल तुझा जंजिरा अजिंक्य  पण आमचा पद्मदुर्ग हि आहे अभेद्य.  यावर काही ओळी सुचतायत
असलास जरी अजिंक्य तू 
आहे पद्मदुर्ग हा अभेद्य रे 
झुकून उभा राहशील तू 
एक दिस या पद्मदुर्गाच्या समोर रे….
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …

पुसतील तुला मृतात्मे 
ज्यांसी  स्वार्थासाठी तू फसविले
झाले जीवन सार्थ मावळ्यांचे
ज्यांनी पद्मदुर्गावरी  बलिदान दिले
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …

शान आहे हा पद्मदुर्ग अमुचा 
फडकतोय यावरी भगवा रे 
आन आम्हास ह्या भगव्याची 
ठेवू यास सतत मानाने फडकत रे 
सावध हो जंजी-या सावध रे …
सावध हो जंजी-या सावध रे …
  
   संपूर्ण गड फिरून झाल्यावर दुर्गवीर एकत्र आले आणि श्रमदान नाही अस कस होईल प्रत्येकाने १ - १ गोनी घेत प्लास्टिक कचरा गोळा करायला सुरुवात केली.  यात ८ वर्षाच्या मुलापासून अगदी ५० - ६० वर्षांच्या आई - बाबां  पर्यंत सर्वांनी हातभार लावला. आम्ही सर्वांनी मिळून तब्बल ६ - ७ गोणी कचरा जमा केला.  बघत बघता निघायची वेळ झाली. गीतू ताई, नितीन दादा, मोनीश दादा यांनी पद्मदुर्ग चा इतिहास,  दुर्गवीर चे गड संवर्धन कार्य याबाबत सर्वांना माहिती दिली.  नंतर आमच्यात सर्वात  वयाने  मोठे असलेल्या आई- बाबां कडून शिवरायांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. शिवरायांची आरती व नंतर  शिवराय, संभाजी राजे, हर हर महादेव च्या जयघोषात आम्ही पद्मदुर्गाचा निरोप घेतला. पण आम्ही प्रत्येकाने एक शब्द दिला त्या पद्मदुर्गाला " शेकडो वर्ष तू स्वराज्य राखलेस आता आमची वेळ आहे, तुझे अस्तित्व राखण्यासाठी आम्ही दुर्गवीर जिवाचे रान करू"  एक दिवस असा  येईल एक पद्मदुर्ग ला येण्यासाठी लोकांची रांग लागेल.  त्याच्या मनात एकाच विचार असेल,  "कसा असेल तो मावळा ज्याने राज्याच्या एक शब्दाखातीर आपले बलिदान दिले",  "अन कसा असेल तो राजा ज्याच्यासाठी मावळे आपले रक्त सांडत होते."  
त्या काळात  शिवाजी महाराजांना, शंभू महाराजांना या गडाचे महत्व समजले पण आपली एवढी उदासीनता कशासाठी……    

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….