सहजच जुन लिखाण चाळताना दुर्गवीर सोबतच्या एका मोहिमेचे लिखाण सापडलं ते आज तुमच्या समोर मांडतो. दुर्गवीर सोबत मी खूप गडदर्शन, श्रमदान मोहिम केल्या पण प्रत्येक मोहिमेचा एक वेगळा अनुभव असतो, त्यातील एक अनुभव म्हणजे दि. ७ ऑक्टोबर २०१२ च्या "सुरगड श्रमदान" मोहिमेचा अनुभव. तस पाहता गणेश उत्सवातल्या दीर्घ विश्रांती नंतर ती माझी पहिलीच श्रमदान मोहीम होती त्यामुळे माझा उत्साह तर "उसेन बोल्ट" पेक्षा वेगाने वाहत होता. ("उसेन बोल्ट" नाही माहित जाऊदे तुम्ही "पी. टी. उषा" अस समजा.) तर माझा उत्साह "पी. टी. उषा" पेक्षा वेगाने वाहत होता. कधी एकदा गडावर जातोय आणि काम करतोय अस झालेलं. त्या "शनिवारी" मला चक्क "सुट्टी" असल्यामुळे आम्ही शनिवारी सकाळी निघणार होतो. जाणारे आम्ही "इन मीन साडे तीन" होतो. त्यात १ मी, २ संतोष दादा, ३ सचिन रेडेकर आणि उरलेला आमचा महेश दादा. बाकीचे दुर्गवीर काम - धाम निपटाके रात्रीच्या ८ च्या गाडीने येणार होते. अगोदर क्वालीस ने जायचं ठरलेलं मग ते Cancel करीत सकाळच्या दिवा Passenger ने जायचं ठरलं. ...